जळगाव जिल्हा परिषदेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांच्या पत्नी तथा जिल्हा महिला बालकल्याण विभागात अधिकारी असलेल्या मयुरी करपे-राऊत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवार, दि. 14 सप्टेंबर रोजी 4 वाजेच्या सुमारास दुपारी घडली आहे. या घटनेची माहिती वार्यासारखी पसरल्याने नातेवाईकांसह अधिकारी वर्गाने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.
मयुरी देवेंद्र राऊत-करपे (वय 32, रा. घुलेवाडी, ता.संगमनेर, जि.नगर, ह.मु.जळगाव) असे मयत महिला अधिकार्यांचे नाव आहे. मयुरी करपे व पती देवेंद्र राऊत हे 2 मुलींसह राहत होत्या. देवेंद्र राऊत हे जळगाव जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर मयुरी करपे-राऊत या जळगाव जिल्हा महिला बालकल्याण विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शनिवार, दि. 14 सप्टेंबर रोजी मयुरी करपे यांनी दुपारी पती देवेंद्र राऊत यांना बीपीचा त्रास होत असल्याने जळगावातील एका खाजगी रुग्णालयात दाखविण्यासाठी आणले होते. त्यावेळी अचानक मयुरी करपे यांची प्रकृती बिघडली. त्यांना भोवळ येऊन खुर्चीवरुन खाली पडल्याने त्या जागीच कोसळल्या.
त्यानंतर नातेवाईकांनी दोघं पती-पत्नीला दुसर्या खाजगी रुग्णालयात तातडीने हलविले. त्याठिकाणी देवेंद्र राऊत यांच्यावर उपचार सुरु आहे. तर मयुरी करपे-राऊत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्यासोबत असलेले सरकारी अधिकार्यांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली होती. नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल होऊन एकच आक्रोश केला. तसेच नातेवाईकांसह सहकारी महिलांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन दि. 15 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात येणार असून त्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहे. त्यांच्यावर घुलेवाडी, ता.संगमनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.