Monday, April 28, 2025

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ,प्रा.भानुदास बेरड यांच्यावर मोठी जबाबदारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रदेश भाजपच्या महाविजय-2024 या अभियानात अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयकपदी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली असून, त्यांनीच या नियुक्तीचे पत्र प्रा. बेरड यांना पाठवले आहे.
तीन राज्यांतील निवडणूक यशानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. महाराष्ट्रातील 48पैकी तब्बल 45च्यावर जागा जिंकण्याचे ध्येय पक्षाने समोर ठेवले आहे व त्यादृष्टीने संघटनात्मक बांधणीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर, नगर जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्षपद भूषवलेल्या प्रा. बेरड यांच्यावर 37-अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी दिलीआहे. नगर दक्षिणेची लोकसभेची खासदारकी आताही भाजपकडेच आहे व डॉ. सुजय विखे या मतदार संघात पक्षाचे खासदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीतही नगर दक्षिणेची जागा पक्षाकडे कायम राहण्याच्यादृष्टीने नवनियुक्त निवडणूक समन्वयक प्रा. बेरड यांना बूथ स्तरापासून संघटनात्मक काम करावे लागणार आहे.
मूळचे नगर तालुक्यातील दरेवाडीचे असणारे प्रा. बेरड मागील 35 वर्षांपासून भाजपमध्ये संघटनात्मक काम करतात. सुरुवातीला नगर तालुकाध्यक्ष, जिल्हा चिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटन सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष अशा पदांवर काम केल्यावर सध्या ते प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य व भाजपच्या मतदार चेतना महाअभियानाचे उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागाचे संयोजक आहेत. आता नव्याने पक्षाने त्यांच्यावर नगर लोकसभा निवडणूक समन्वयकपदाची जबाबदारी दिली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे पक्षातून अभिनंदन होत आहे. दरम्यान, पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार व पक्षाचे महाविजय-2024 अभियान यशस्वी करणार, अशी प्रतिक्रिया प्रा. बेरड यांनी नव्या नियुक्तीवर बोलताना व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles