Monday, April 28, 2025

नगर – दौंड महामार्गावर भीषण अपघात, नगर तालुक्यातील दोघा युवकांचा जागीच मृत्यू

नगर – दौंड महामार्गावर अरणगाव शिवारात मेहराबाद भुयारी पुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीने सुझुकी अॅक्सेस मोपेडला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोपेड वरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२०) मध्यरात्री १२ ते १२.३० च्या सुमारास घडली.

साहिल कैलास नेटके (वय १८) व अनिकेत बंडू साठे (वय १७, दोघे रा. वाळकी, ता. नगर) असे मयत युवकांची नावे आहेत. हे दोघेजण सुझुकी अॅक्सेस मोपेडवर एका धार्मिक कार्यक्रमासाठी वाळकी येथून केडगाव येथे गेले होते. तेथून एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जावून रात्री १२ च्या सुमारास ते नगर दौंड महामार्गाने वाळकी कडे जात होते. अरणगाव शिवारात मेहराबाद येथील भुयारी पुलाजवळ ते आलेले असताना एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगात आली आणि त्या गाडीने यांच्या मोपेडला जोराची धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर पडून गंभीररित्या जखमी झाले. या अपघातानंतर त्यांचा मित्र संदेश अरवडे याने व इतर लोकांनी रुग्णवाहिका बोलावून त्या दोघांना रात्री १.१० च्या सुमारास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघेही मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अपघात ग्रस्त स्कॉर्पिओ गाडी घेवून चालक पसार झालेला होता. या गाडीचा नंबर पोलिसांनी मिळवला असून सदर गाडी ही नागपूरची असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून मयतांच्या नातेवाईकांच्या फिर्यादी नंतर अपघाताचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान मयत साहिल नेटके हा रुईछत्तीसी येथील महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षात तर अनिकेत साठे हा वाळकी गावातीलच न्यु इंग्लिश स्कुल मध्ये १२ वी च्या वर्गात शिकत होता. या दोघा युवकांच्या अपघाती निधनाने वाळकी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि.२१) सकाळी दोघांचे शवविच्छेदन केल्या नंतर दुपारी गावातील स्मशान भूमीत दोघांवर अंत्य संस्कार करण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles