राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे रात्री जेवणानंतर शतपावली करणारा तरुण मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या धडकेत ठार झाला. धडक देणारा दुचाकीस्वार हा वाळूतस्करीशी निगडित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळी जमलेल्या स्थानिक रहिवाशांनी दुचाकीस्वाराच्यामागून येणार्या वाळूच्या डंपरच्या टायरची हवा सोडून देत पोलिसांच्या ताब्यात दिला. सकाळी तरुणाचा अंत्यविधी झाल्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी अवैध वाळू तस्करीविरोधात तब्बल 2 तास रास्तारोको केला. तहसीलदार व पोलीस अधिकार्यांना खडेबोल सुनावले. अनधिकृत वाळूच्या गाड्या दिसतील तिथे त्या पेटवून दिल्या जातील असा खणखणीत इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी वाळूतस्करी विरोधात ग्रामस्थांचा प्रक्षोभ दिसून आला. संबंधितावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार अमोल मोरे यांनी दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.
राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील सिव्हिल इंजिनियर प्रशांत सुनील कडू (वय 27) यांचा यांचा शुक्रवारी रात्री दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. रात्री नऊ वाजता जेवणानंतर ते पत्नीसमवेत पाथरे बुद्रुक कोल्हार रोडलगत असलेल्या त्यांच्या घराजवळ रस्त्याने शतपावली करत होते. अचानक त्यांना पाठीमागून दुचाकीची जबर धडक बसली. दुचाकीवर दोघेजण स्वार होते. धडक इतकी जोराची होती की, यामध्ये प्रशांत कडू जबर जखमी झाले व प्रचंड रक्तस्राव झाला. त्यांना तातडीने उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यानच्या काळात घटना घडल्यानंतर दोघांपैकी एक दुचाकीस्वार पळून गेला. दुसर्याला स्थानिक ग्रामस्थांनी पकडले. ते अवैध वाळू तस्करीशी निगडित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुचाकीमागून वाळूचा डंपर येत होता. स्थानिकांनी डंपर थांबवून त्याची हवा सोडून दिली. याबाबत महसूल अधिकारी व पोलिसांना कळविण्यात आले.