अहमदनगर- एक मोठा अपघात झाला आहे. येथे श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावात उसाने भरलेला ट्रक उलटल्यामुळे त्याखाली दबून रस्त्याच्या कडेने चाललेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
उसाने भरलेला ट्रक श्रीरामपूरकडून बाभळेश्वरच्या दिशेने चालला होता. मात्र खंडाळा गावात हा ट्रक उलटला. त्याचवेळी रस्त्याच्या कडेने जाणारी खंडाळा येथील रहिवासी उषाबाई विघावे ही महिला ट्रकमधील उसाखाली दबली गेली. ज्यात तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
तसेच मोटारसायकलवर जाणारे बेलापूर येथील दोघेजण जखमी झाले. वर्दळीच्या ठिकाणी अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत उसाखाली दबलेल्या मयत महिलेला तसेच दोन्ही जखमींना बाहेर काढले.
गावातील काही लोकांनी जेसीबी आणून ऊस बाजूला करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती तसेच कोल्हार येथील पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक बाभळेश्वर मार्गे श्रीरामपूर अशी वळवण्यात आली आहे. त्यामुळे रहदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाहतुकीच्या कोंडीत मोठी भर पडली आहे.