नगर : तपासणीत दोषी आढळल्याने जिल्ह्यातील तीन कृषी निविष्ठांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले तर आणखी तीन परवाने निलंबित करण्याची कारवाई कृषी विभागाने केली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून बाजारात बि-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरात पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. जिल्हा व तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत करण्यात आली आहे.
गुणवत्तापूर्ण निविष्ठाची उपलब्धता, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी एकूण १५ भरारी पथके कार्यरत करण्यात आली असून, भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जात आहे. फसवणूक करणारे विक्री केंद्रांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत दोषी आढळून आलेल्या १ बियाणे विक्री केंद्र व २ खते विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत तर १ बियाणे, १ खते व १ किटकनाशके असे ३ परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आली आहेत. निविष्ठा उत्पादक, निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिला आहे.