शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खाजगी संस्था नियुक्त,
नगर : नगर शहरात अखेर मोकाट कुत्री पकडुन निर्बीजीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. खाजगी संस्थेने हे काम सुरू केले आहे. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने नगरकर भयभीत झाले आहेत. या गंभीर मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेनेचे विक्रम राठोड यांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन खाजगी ठेकेदार नियुक्तीची मागणी केली होती. वेळ प्रसंगी महापालिकेत अधिकाऱ्यांच्या दालनात मोकाट कुत्री सोडली जातील असा इशारा दिला होता. या आक्रमक पवित्र्याची दखल घेत प्रशासनाने हालचाली करुन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खाजगी संस्थेला काम दिले असून मागील तीन चार दिवसांपासून सदर काम सुरू करण्यात आले आहे.
अभिषेक कळमकर म्हणाले की, शहर आणि उपनगरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. तब्बल 25 हजार मोकाट कुत्री मनपा हद्दीत असावी असा अंदाज आहे. यापूर्वीच्या ठेकेदाराला या कामासाठी मनपाने कोट्यवधी रुपये दिले परंतु मूळ समस्या कायम राहिली. मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुलांना घराबाहेर खेळणेही धोकादायक बनले आहे. याशिवाय रात्री अपरात्री रस्त्यावरून ये जा करताना नगरकरांना अक्षरशः जीव मुठीत धरून जावे लागते. यापूर्वीच्या ठेकेदार संस्थेने मोकाट कुत्री पकडण्याचे काम न करता फक्त पैसे लाटण्याचे काम केले. या ठेक्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचेही समोर आले होते.
आता महापालिका प्रशासनाला जाग आली असून मोकाट कुत्री पकडण्यासाठी ठेकेदार नेमला आहे. हे काम जलदगतीने आणि सातत्यपूर्ण होणे आवश्यक आहे. फक्त कागदावरच कुत्री पकडल्याची नोंद असू नये प्रत्यक्षात मोकाट कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. यावर आम्ही लक्ष ठेवून असणार आहोत. कामात कुचराई झाल्यास वेळ प्रसंगी फौजदारी कारवाईसाठी प्रयत्न केले जातील. वास्तविक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येवर मनपा प्रशासनाने स्वतःहून उपाय करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने मग्रूर प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. मनपात प्रशासक राज आल्यापासून अधिकारी एककल्ली कारभार करीत आहेत. यामुळे नगरकरांना नागरी सेवांपासून वंचित रहावे लागत आहे. येणाऱ्या काळात नगरकरांच्या प्रश्नांवर आणखी आक्रमक भूमिका घेऊन प्रशासनाला धारेवर धरले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.