माझी वसुंधरा अभियानात अहमदनगर मनपा राज्यात दुसऱ्या स्थानी
नगर : पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत असून पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर अभियान आधारित आहे. 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत ड वर्ग गटातून अहमदनगर महापालिकेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. बक्षीसापोटी मनपाला सहा कोटी रुपये मिळणार आहे. तत्कालिन मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरात अतिशय प्रभावीपणे सदर अभियान राबविण्यात आल्याने नगर महापालिकेला राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.
माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि.2 ऑक्टोंबर 2020 पासून राबवण्यास सुरुवात झाली आहे. माझी वसुंधरा अभियान 4.0 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि.1 एप्रिल 2023 ते दि. 31 मे 2024 दरम्यान राबविण्यात आले. त्यात राज्यातील 414 नागरी स्थानिक संस्था व 22 हजार 218 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियानाच्या कालावधीत केलेल्याकामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणामार्फत करण्यात आले. अहमदनगर महापालिकेला 3 ते 6 लाख लोकसंख्येच्या गटात दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या उपक्रमांतर्गत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून निसर्गाच्या पंचतत्वाचे संरक्षण संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना राबवायच्या आहेत. जाहीर झालेल्या बक्षिसाची 50 टक्के रक्कम निधी अर्थसंकल्पीत झाल्यानंतर तात्काळ संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जाणार आहे. तर उर्वरित रक्कम उपाययोजनांचा प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर दिला जाणार आहे. यापूर्वी अहमदनगर महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.