Friday, February 23, 2024

अंकुश चत्तर हत्याकांड… भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदेसह आठही आरोपींना मोक्का

अहमदनगर-अंकुश चत्तर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीतील भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यासह आठही आरोपींना मंगळवारी मोक्का न्यायालयाने गुरूवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्या खून प्रकरणानंतर नगरसेवक शिंदेसह त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

त्याचा तपास उपअधीक्षक खेडकर करीत आहेत. त्यांनी सुरज ऊर्फ मिया राजन कांबळे, स्वप्नील रोहिदास शिंदे, महेश नारायण कुर्‍हे, अभिजित रमेश बुलाख, मिथुन सुनिल धोत्रे, अक्षय प्रल्हादराव हाके, राजू भास्कर फुलारी, अरुण अशोक पवार या आरोपींना ताब्यात घेऊन मोक्का न्यायालयात हजर केले.

आरोपींनी संघटितपणे गुन्हे करून त्यातून आर्थिक फायदा घेत मालमत्ता जमा केली का, गुन्हे करुन मिळवलेली रक्कम कोणत्या बँकेत अथवा पतसंस्थेत जमा केली आहे का, संघटित केलेल्या विविध गुन्ह्यातील फिर्यादी व तपासी अधिकार्‍यांचे तपास व जबाब, आरोपीने त्यांच्या नातेवाइकांकडे मालमत्ता ठेवली आहे का, त्यांच्या नावावर मालमत्ता घेतली आहे का, स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावाने वाहने खरेदी केली का, आणखी काही गुन्हे केले का, बेनामी प्रॉपर्टीबाबत तपास करणे, यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली.

आरोपींच्या वतीने अ‍ॅड. महेश तवले व अ‍ॅड. संजय दुशिंग यांनी बाजू मांडली. न्यायालयाने तपासी अधिकार्‍यांची मागणी मंजूर केली. दरम्यान, आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर न्यायालय आवारात मोठी गर्दी झाली होती. पोलिस अधीक्षकांनी काठी हातात घेताच जमावाने पळ काढला. त्यामुळे न्यायालयाबाहेरील रस्त्यावर काहीशी पळापळ झाली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles