नगर (प्रतिनिधी)- जोरदार पावसामुळे बाबुर्डी घुमट (ता. नगर) कार्यक्षेत्र व वाळुंज हद्दीतील मेंडका नदीला आलेल्या पूराने नदीच्या पलीकडील वाडी-वस्तींचा गावापासून संपर्क तुटला आहे. पूराचे पाणी कमी होत नसल्याने व पर्यायी रस्ता नसल्याने जीव धोक्यात घालून ग्रामस्थ पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण करत आहे. मागील तीन दशकापासून ग्रामस्थ या नदीवर पुल बांधण्याची मागणी करत असून, लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. पुलाचे काम करा, अन्यथा विधानसभेला मते मागण्यासाठी येऊ नका! असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाबुर्डी घुमट कार्यक्षेत्र व वाळुंज हद्दीत हा परिसरत असल्याने या परिसराची हद्द श्रीगोंदा आहे. तर मतदार संघ पारनेर असल्याने दोन्ही कडील लोकप्रतिनिधी या ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याची संतप्त भावना ग्रामस्थांची आहे. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसाने वाळुंज हद्दीतील मेंडका नदी लगत असलेल्या चव्हाण मळा, कुंजीर मळा, दरेकर मळा तसेच हिंगे मळा येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले असून, त्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. सदर नदीवर पुल होण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याचे बाळासाहेब कुंजीर, देवा कुंजीर, पवन कुंजीर, गोपाल कुंजीर, जितेंद्र दरेकर व मा. उपसरपंच तानाजी परभाणे यांनी म्हंटले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या भागात अशीच परिस्थिती निर्माण होत असून, कामगार वर्गाला मोलमजूरी पासून वंचित रहावे लागत असून, दुग्ध व शेती व्यवसाय कोनमळून पडतो. तर मुलांना देखील शाळेत जाता येत नाही. आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्यास जीव धोक्यात घालून पूराच्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याची माहिती मा. उपसरपंच तानाजी परभाणे यांनी दिली.
हद्द श्रीगोंदा तर मतदारसंघ पारनेर…नगर तालुक्यातील ‘या’ गावाची कुचंबणा…पुरामुळे ग्रामस्थांचे हाल
- Advertisement -