Tuesday, December 5, 2023

भागानगरे खून प्रकरणातील आरोपींना कारागृहात भेटण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर

नगर – शहरातील ओमकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपींना भेटण्यासाठी कारागृहात बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या व या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अहमदनगर जिल्हा (सबजेल) कारागृहाच्या तुरुंग अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मयताचे वडिल पांडुरंग भागानगरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आरोपी गणेश हुच्चे यांच्या अवैध धंद्यांवर कामावर असलेला अमोल येवले याने अमोल केरप्पा हुच्चे या बनावट नावाचा आधारकार्ड घेऊन कारागृहात आरोपींना भेट असल्याचा आरोप पांडुरंग भागानगरे यांनी केला आहे. निवेदनात म्हंटले आहे की, ओमकार उर्फ गामा भागानगरे याचे 20 जून रोजी बालिकाश्रम रोड येथे निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी गणेश हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा हे न्यायालयीन कोठडीत सबजेल कारागृहात आहेत. कैद्यांच्या घरच्या लोकांना भेटण्यासाठी बुधवार हा दिवस निश्‍चित केलेला आहे. गणेश हुच्चे याचे शहरात अवैधधंदे असून, अमोल येवले हा त्या ठिकाणी कामगार आहे. अमोल येवले याने अमोल केरप्पा हुच्चे या नावाने बोगस आधार कार्ड बनवले असून, या आधारकार्डद्वारे तो नियमितपणे आरोपी गणेश हुच्चे याची भाऊ म्हणून भेट घेत आहे. अमोल येवले हा नेमका कोणत्या नावाने आरोपीची भेट घेतो? हे पाहण्यासाठी 6 ऑक्टोबर रोजी सबजेल येथे गेलो असता, या प्रकरणासंबंधी तुरुंग अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रजिस्टरची तपासणी केली. त्यावेळी येणारा व्यक्ती बनावट आधारकार्डद्वारे आरोपीची भेट घेत असल्याचा उलगडा झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत तुरुंग अधिकारी यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता, त्यांनी दमबाजी करुन आंम्ही कोणाला भेटू द्यायचे, कोणाला नाही? आंम्ही ठरवणार. या भानगडीत पडू नका, अन्यथा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी तुरुंग अधिकारी यांनी दिल्याचा आरोप भागानगरे यांनी केला आहे. बोगस आधार कार्डचा वापर करून येवले हा आरोपी हुच्चे याला भेटत असून, त्याला तुरुंग अधिकारी मदत करत असल्याचेही निवेदनात म्हंटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: