Wednesday, April 30, 2025

अहमदनगर ब्रेकिंग: भाजपचा नगरसेवक खंडणी प्रकरणात अडकला! बार चालकाकडून आठ लाखांची मागणी

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीचा भाजप नगरसेवक हितेश कुंभार खंडणी प्रकरणात कोनगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. भिवंडी बायपास रस्त्यावरील एका बिअरबार चालकाकडून डान्सबार आणि सर्व्हिसबार सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी आठ लाख रुपये आणि त्यानंतर प्रतिमहिना 25 हजार रुपये देण्याची मागणी त्याने केली होती. आपण मुंबई भाजपचे नगरसेवक असून मागीतलेली रक्कम न दिल्यास बार बंद करण्याची धमकी त्याने दिली होती. संबंधित बारचालकाने कोनगाव पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर नगरसेवकासह त्याच्या दोन साथीदारांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली. या वृत्ताने मुंबई भाजपसह अहमदनगर जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे.
सदरची कारवाई मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दितील भिवंडी बायपास रस्त्यावर करण्यात आली. या परिसरात असंख्य डान्स बार आहेत. त्यातील लैला डान्सबारमध्ये सदरचा प्रकार घडला. हा डान्सबार संतोष भोईर आणि हरीश हेगडे हे दोघेजण चालवतात. याच डान्सबारला लक्ष्य करीत हितेश कुंभार याने बारचालकाकडून बार निर्विघ्न सुरु ठेवण्यासाठी ऑर्केस्ट्राबारचे पाच आणि सर्व्हिसबारचे तीन असे ‘वनटाईम’ आठ लाख रुपये आणि दर महिन्याला 25 हजार रुपये देण्याची मागणी केली. यावेळी त्याने आपण मुंबई भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असल्याचीही बतावणी केली. आपल्या व्यवसायात अडचण नको म्हणून संबंधित बारचालकाने अन्य बारमालकांशी चर्चा करुन मागीतलेली रक्कम देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे बारचालकाला वेळ देत ‘ते’ तिघेही तेथून गेले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे नगरसेवक हितेश कुंभार व त्याचे दोन्ही साथीदार पुन्हा ‘लैला’ बारमध्ये आले व पैशांची मागणी करु लागले. यावेळी बारचालक संतोष भोईर यांनी आपण नऊ बारचालकांकडून प्रत्येकी तीन हजार याप्रमाणे सत्तावीस हजार रुपयांची रक्कम जमा केल्याचे त्यांना सांगितले.मात्र हितेश कुंभार हा मात्र ‘वनटाईम’ आठ लाख रुपये देण्याच्या मागणीवर ठाम राहीला. त्यावेळी भोईर यांनी सदरची रक्कम मोठी असल्याने त्यासाठी थोडा वेळ देण्याची मागणी केली. बारचालक आपल्या जाळ्यात अडकत असल्याचे पाहून कुंभार याने त्यांना ‘पैसे न दिल्यास तुम्ही कसा बार चालवता तेच बघतो’ अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या बारचालकाने त्यांना थोड्यावेळ बारमध्येच प्रतीक्षा करण्यास सांगून तेथून थेट कोनगाव पोलीस ठाणे गाठले.यावेळी त्यांनी संपूर्ण प्रकार कोनगावचे पोलीस निरीक्षक विनोद कडलग यांना सांगितल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांनी तत्काळ भिवंडी बायपास मार्गावरील लैला डन्सबारमध्ये सापळा लावला. यावेळी मासिक हप्ता म्हणून 27 हजार रुपयांची रक्कम स्वीकरतांना कोनगाव पोलिसांनी अकोले नगरपंचायतीचा सदस्य, नगरसेवक हितेश रामकृष्ण कुंभार (वय 33, रा.कमानवेस, अकोले) याच्यासह त्याचे साथीदार देवेंद्र चंद्रकांत खुंटेकर (रा.शासकीय निवासस्थान, चर्चगेट) आणि राकेश सदाशिव कुंभकर्ण (रा.शुक्रवारपेठ, पुणे) अशा तिघांना रंगेहात पकडले. यावेळी त्या तिघांनाही पोलीस ठाण्यात नेवून चौकशी केली असता पकडण्यात आलेला नगरसेवक मुंबई भाजपचा नव्हेतर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक चारचा नगरसेवक असल्याचे समोर आले.

प्रकरणी लैलाबारचे चालक संतोष बबन भोईर (वय 53, रा.घोडबंदर रोड, ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांवरही भारतीय दंडसंहितेच्या कलम 384, 386, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे, सध्या तिघेही पोलीस कोठडीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles