अहमदनगर: एकीकडे भाजपची उत्तर नगर जिल्ह्याची कार्यकारीणी घोषणा अद्याप रखडलेली आहे. अशात दक्षिण नगर जिल्ह्याच्या घोषित कार्यकारिणीत शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पदाधिकारी निवडीला आ.मोनिका राजळे यांनी पक्षांतर्गत गटातटाच्या राजकारणात स्थगिती आणावी लागल्यामुळे मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर व्यक्त केलीय. यावेळी मुंडे गटाचे नाराज गोकुळ दौंड, अरुण मुंडे, बाळासाहेब सोनवणे, वैद्य आदींच्या कार्यकर्त्यांनी बावनकुळे कार्यक्रमस्थळी असताना जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केले.
पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे, माजी आ.शिवाजी कर्डीले, दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदींच्या उपस्थितीती मध्ये पारनेर,राहुरी आणि शेवगाव-पाथर्डी येथील पदाधिकार्यांचा मेळावा बावनकुळे यांच्या उपस्थितीत शेंडी जवळ मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी शेवगाव-पाथर्डीच्या नाराज गोकुळ दौंड गटाने आपल्या भावना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समोरे मांडल्या. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर बावनकुळे यांच्या ताफ्या नजीक आ.राजळे यांनी पदांना स्थगिती दिलेल्या मुंडे एकनिष्ठ जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे अमर रहे, खा.सुजय विखे तुम आगे बढो हम तुम्हांरे साथ है अशा घोषणा देत शक्तीप्रदर्शन केले.
यावेळी बोलताना ओबीसी जिल्हाध्यक्ष पदावर निवड होऊन पदाला स्थगिती मिळालेले गोकुळ दौंड यांनी आपण 30 वर्षे पक्षासाठी एकनिष्ठ पणे काम केले आहे. मात्र आमच्या जुन्या अनेक कार्यकर्त्यांच्या पदांना आ.मोनिका राजळे यांनी स्थगिती दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब सोनवणे, संजय मरकड, वैद्य आदींच्या पदांना आ.राजळे यांनी स्थगिती देत निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. आज आम्ही याबद्दल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे दाद मागितली आहे. पाहू काय निर्णय होतो ते, त्या नंतर पुढील निर्णय घेऊ असा गर्भित इशारा दौंड यांनी यावेळी दिला.माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हापरिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, संजय मरकड, वैद्य आदी मुंडे समर्थक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.