नगर तालुका (प्रतिनिधी) – सासू-सासऱ्यांनी अतिक्रमण केल्याने सुनेला ग्रामपंचायत सदस्यत्व गमवावे लागले आहे. नगर तालुक्यातील रतडगाव ग्रामपंचायत सदस्य मुक्ता दत्तात्रय मोहिते यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे.
रतडगाव येथील ग्रामस्थ संपत शिंदे, संदीप वाघोले, भाऊसाहेब चेमटे, राजू जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत सदस्या मुक्ता दत्तात्रय मोहिते यांना अपात्र घोषित करण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी अन्वये अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी नगर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
ग्रामपंचायत सदस्य मोहिते यांचे सासू व सासरे शिवाजी मोहिते व हिराबाई मोहिते यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याचे त्यात निष्पन्न झाले. एकत्रित कुटुंबात सुन, मुलगा व सासू-सासरे राहात होते. या कुटुंबाची शिधापत्रिकाही एकच आहे. त्यामुळे सासू-सासऱ्यांनी अतिक्रमण केलेल्या जागेमध्येच ग्रामपंचायत सदस्या एकत्र कुटुंबपद्धतीने राहत असल्याचा दावा अॅड. गोरक्ष पालवे यांनी केला. तो ग्राह्य धरण्यात आला, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य मुक्ता मोहिते यांना अपात्र करण्याचा निर्णय जाहीर केला.अर्जदारांच्या वतीने अॅड. गोरक्ष पालवे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. राजेश खळेकर, अॅड. रोहित बुधवंत, अॅड, अंकिता सुद्रिक, अॅड. सागर गर्जे यांनी साह्य केले.
हमीदपूरच्या महिला सदस्यावर ३ अपत्यांमुळे ओढवली आपत्ती
तीन अपत्यांमुळे ग्रामपंचायत सदस्यत्व गमविण्याची वेळ हमीदपूर (ता. नगर) ग्रामपंचायत सदस्या प्रमिला छबूराव कांडेकर यांच्यावर आली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ही कारवाई केली आहे.
हमीदपूर ग्रामपंचायतीची काही महिन्यांपूर्वी निवडणूक झाली होती. प्रमिला कांडेकर या विजयी झाल्या होत्या, त्यांनी निवडणूक अर्जामध्ये तीन अपत्यांची माहिती लपविली आहे, अशी तक्रार अनिता संदीप खेसे, बाबासाहेब किसन वैराळ, मंगल बाबासाहेब कांडेकर, संतोष माधव खेसे, कचरू किसन कांडेकर आणि कमलाबाई लक्ष्मण कांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये ग्रामपंचायत सदस्या प्रमिला कांडेकर यांना तीन अपत्य असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी या अहवालानुसार ग्रामपंचायत सदस्या प्रमिला कांडेकर यांचे सदस्यत्त्व रद्द केले आहे.