अहमदनगर-नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गजराजनगर परिसरात काल (गुरूवारी) सायंकाळी साडे सातच्या सुमारास एका युवकाच्या डोक्यात गोळी घुसून तो जखमी झाल्याची घटना घडली. किरण दत्तात्रय मांजरे (वय 23 रा. गजराजनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. दरम्यान, काळामाथा येथील बीटीआर या लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रात रात्रीच्यावेळी सुरू असलेल्या सरावादरम्यान मांजरे याला गोळी लागून तो जखमी झाला असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.
किरण मांजरे हा युवक गुरूवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास गजराजनगर येथील पेट्रोल पंपाजवळ असताना अचानक त्याच्या डोक्यात गोळी घुसून तो जखमी झाला. त्याच्यावर अनोळखी व्यक्तीने गोळीबार केला असल्याची शक्यता सुरूवातीला वाटत होती. स्थानिकांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. सहा. निरीक्षक सानप पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहिती घेतली असता बीटीआर येथे रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या सरावादरम्यानची गोळी मांजरे याच्या डोक्यात घुसली असल्याचे लक्षात आले.
दरम्यान, जखमी किरण मांजरे याला छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढली आहे. घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहा. निरीक्षक नितीन रणदिवे, मुजावर यांनी रुग्णालयात धाव घेतली. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.