नगर : न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ जागा मालकांच्या वारसांना जमिनीचे वाटप करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून गुरुवारी पोलीस बंदोबस्तात बुरुडगाव रस्त्यावरील चंदन इस्टेट, माणिकनगर, विनायकनगर, भोसले आखाडा भागात रेखांकने करण्यात आले. या भागातील रहिवाशांना शुक्रवारपर्यंत घरे खाली करण्याच्या अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, भूमी अभिलेख उपअधीक्षक अविनाश मिसाळ, मोजणीदार महेश डावरे, नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर, कैलास दळवी, संजय गोलेकर, मंडलाधिकारी राजेंद्र बारस्कर आदींसह २० कर्मचाऱ्यांच्या पथकाने मोजणी करून रेखांकने केली. उद्या ताबा देऊन त्याच्या ताब्यात पावत्याही मूळ मालक ८ जणांच्या सुमारे ७० ते ८० वारसदारांना दिल्या जाणार आहेत.
पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोतवालीचे निरीक्षक दराडे, तोफखान्याचे निरीक्षक कोकरे यांच्यासह १०० हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
पुणे रस्त्यावरील ‘शिल्पा गार्डन’ या मंगल कार्यालयापासून (सर्व्हे क्रमांक ५२/२) मोजणी सुरुवात करण्यात आली. ती सर्व्हे क्रमांक ५०/४ पर्यंत सायंकाळपर्यंत चालली.