अहमदनगर-तुमचा मुलगा दोन हजार रूपयांसाठी बदनामी करतो म्हणून त्या मुलाच्या वडिलांच्या गळ्यावर एकाने चाकूने वार केल्याची घटना बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगर येथे गुरूवारी (13 जून) रात्री साडेदहा वाजता घडली. जगन्नाथ दादाबा गर्जे (रा. चोभे कॉलनी, गांधीनगर, बोल्हेगाव) असे जखमीचे नाव आहे.
याप्रकरणी राजश्री गर्जे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमित चंद्रकांत शिंदे, अमितची मावशी लता (पूर्ण नाव नाही), सविता काळे आणि मावस बहीण अनुजा (पूर्ण नाव नाही) यांच्याविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा मुलगा निखिल हा दोन हजार रूपयांसाठी बदनामी करतो म्हणून अमित शिंदे याने फिर्यादी यांच्या मुलाला व पतीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अमितची मावशी लता आणि सविता काळे, त्याची मावस बहीण अनुजा यांनी फिर्यादीच्या घरी येऊन मोठ्याने शिवीगाळ केली.
अमित शिंदे याने फिर्यादीचे पती जगन्नाथ यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रीवास्तव यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.