अहमदनगर – चहाची उधारी मागितली असता ‘मी नगर शहराचा दादा आहे, तू मला पैसे कसे काय मागतो’ असे म्हणून व्यावसायिकाला शिवीगाळ, दमदाटी करून लोखंडी फायटरने मारहाण केली. ईश्वर मोहन जायभाये (वय 38 रा. प्रेमदान चौक, सावेडी) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात ( सोन्या नेटके (पूर्ण नाव नाही, रा. सावेडी) व त्याच्या साथीदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वर यांची प्रेमदान चौक येथे ईश्वर टी सेंटर नावाने चहाची टपरी आहे.
त्यांच्या टपरीवर सोन्या नेहमी चहा पिण्यासाठी येत असतो व पैसे न देता उधारी ठेवून निघून जातो. तो रविवारी (30 जून) रात्री आठ वाजता त्याच्या साथीदारासह टपरीवर चहा पिण्यासाठी आला. चहा पिऊन झाल्यानंतर ईश्वर याने त्याच्याकडे उधारीची मागणी केली असता त्याने ‘मी नगर शहराचा दादा आहे तू मला पैसे कसे मागतो’ असे म्हणून ईश्वर यांना शिवीगाळ, दमदाटी करून लोखंडी फायटरने मारहाण केली.
त्याच्या सोबतच्या साथीदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर सोन्या म्हणाला, ‘तू मला पैसे मागितले तर मी तुला जिवंत सोडणार नाही उलट तूच मला पैसे द्यायचे’ अशी धमकी दिली व तेथून निघून गेले. जखमी ईश्वर यांनी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.