अहमदनगर -अल्पवयीन मुलीसोबत लग्न ठरलेल्या युवकाने तिच्यावर लग्न करण्यापूर्वीच वारंवार अत्याचार केला. नगर शहरातील एका उपनगरात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीने याप्रकरणी मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून युवकाविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. किरण राजेंद्र पलघडमल (वय 24 रा. पलघडमल वस्ती, सात्रळ, ता. राहुरी) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. 26 मे 2024 रोजी फिर्यादी अल्पवयीन मुलीची तिच्या मामाच्या लग्नात किरण सोबत ओळख झाली होती. ते फोनवर बोलत होते. त्याच्या घरच्यांनी फिर्यादीसोबत लग्न करण्याची मागणी केली.
तिच्या घरच्यांनी होकारही दिला. त्यामुळे त्यांच्यात फोनवर बोलणे होत होते. त्यानंतर फिर्यादीसोबत राहुरी तालुक्यातील एका गावात साखरपुड्यात लग्न करत असताना मुलीचे वय कमी असल्याने लग्न पार पडले नाही. परंतु किरण हा फिर्यादीच्या संपर्कात राहून तिच्याशी बोलणे करत जवळीक साधत होता. त्यातच एका दिवशी फिर्यादीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेवून किरण हा तिच्या घरी गेला व आपले लग्न होणार आहे असे म्हणून तिच्याशी शारिरिक संबंध केले. त्यानंतर देखील फिर्यादीच्या एकटेपणाचा फायदा घेवून वेळोवेळी शारिरिक संबंध केले. त्यानंतर माझे दुसर्या मुली सोबत प्रेम संबंध आहेत असे सांगून तु माझा आदर करत नाही अशी वेगवेगळी कारणे देवून फिर्यादीसोबत जमलेले लग्न मोडले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, मंगळवारी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना संशयित आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. पथकाने त्याचा शोध घेऊन अटक केली. निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश पाटील, अंमलदार तनवीर शेख, दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, दिनेश मोरे, सुधीर खाडे, सुरज वाबळे, वसिम पठाण, शफी शेख, सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतीश भवर, बाळासाहेब भापसे, चेतन मोहिते, राहुल म्हस्के यांच्या पथकाने ही कामगिरी केली.