अहमदनगर -अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करून तिच्याकडून सुमारे 10 तोळ्यांच्या दागिन्यांसह सात लाख 10 हजाराचा ऐवज लुटणार्या तरूणाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.
रेहान राजु शेख (रा. तपोवन रस्ता, सावेडी) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याने मुलीकडून घेतलेले सोने बँकेत ठेवले असल्याची माहिती असून पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.
सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत रेहान शेख याने नगर शहरातील एका उपनगरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीकडून सुमारे 11 तोळ्याचे दागिने व रोकड असा सात लाख 10 हजार रूपयांचा ऐवज उकळला होता. तसेच तिला कॅफेत घेऊन जात तिच्या सोबत अश्लिल चाळे केल्याची घटना समोर आली आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मोबाईलच्या फोन पे मधील ट्रांजेक्शन व घरातील कपाटाची चावी सापडत नसल्याने त्यांनी पत्नी व मुलीकडे चौकशी केल्यानंतर मुलीने याबाबत कबूली देत रेहान कडून धमकी दिली जात असल्याने त्याला पैसे पाठविले व घरातील दागिने दिले असल्याची कबूली दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी सदरचा प्रकार गुरूवारी दुपारी तोफखाना पोलिसांना सांगितला.
पोलिसांनी रेहान शेख विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रेहान शेख याचा शोध घेत त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली असून पोलीस त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अधिक तपास करत आहेत.