Sunday, September 15, 2024

दादागिरी सुडाचे राजकारण नगर शहराच्या बकाल अवस्थेमुळे तरुण-तरुणी शहर सोडून चालले

शहराच्या बकाल अवस्थेमुळे तरुण-तरुणी शहर सोडून चालले -डॉ. अनिल आठरे
सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हा आढावा बैठकीत शहराच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा
पदाधिकाऱ्यांची निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या बकाल अवस्थेमुळे तरुण-तरुणी शहर सोडून चालले आहेत. याला फक्त सुडाचे राजकारण व शहरातील दादागिरी कारणीभूत आहे. फक्त भौतिक सुविधांमुळे म्हणजे शहराचा विकास म्हणता येणार नाही, शहरातील वातावरण देखील चांगले व पोषक होण्यासाठी नागरिकांना बदलात्मक भूमिका घ्यावी लागणार असल्याचे प्रतिपादन डॉ. अनिल आठरे यांनी केले.
सह्याद्री छावा संघटनेची जिल्हा आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीस अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले डॉ. आठरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे, राजेश भाटिया, सुहास सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा तनिज शेख, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, सुधीर कुऱ्हाडे, आशाताई पवार, दत्ता वामन, शंकर वामन, सदाशिव निकम, उत्तम पवार, मेजर शिवाजी वेताळ आदी उपस्थित होते.
पुढे डॉ. आठरे म्हणाले की, आजही शहरातील मूलभूत प्रश्‍न सुटलेले नाही. प्रलंबित रस्त्याचे कामे पावसाळ्यात सुरू केले जात आहे. हे रस्ते निवडणूक संपली की, वाहून जाणार आहेत. पुन्हा खड्डेमय शहर होणार असून, नागरिकांनी बदलाचा विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रावसाहेब काळे म्हणाले की, लोकप्रतिनिधी शहर विकासाच्या नावाखाली आपल्या गुंड कार्यकर्त्यांना पोसण्याचे काम करत आहे. कार्यकर्त्यांना कामाचे ठेके देऊन एकप्रकारे मलिदा लाटण्याचे काम सुरु आहे. शहरातून विधानसभेसाठी चांगला आणि विकासाभिमुख उमेदवार उभा राहिल्यास छावा संघटना त्याच्या मागे उभी राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सुहास सोनवणे यांनी संघटनेची वाटचाल भविष्यात चांगला उमेदवार निवडून आणण्यासाठी राहणार आहे. जिल्हा शेजारील सर्व शहरांचा विकास झाला, मात्र दहशतीच्या राजकारणाने शहराचा विकास खुंटला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत सह्याद्री छावा संघटनेच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी मालन राजू जाधव, नगर तालुकाध्यक्षपदी रमेश सदाशिव पंडित व पाथर्डी तालुकाध्यक्षपदी सचिन पवार यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. अनिल आठरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक, शहर व जिल्ह्यातील प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles