Saturday, April 26, 2025

‘शास्तीमाफी’कडे बड्या थकबाकीदारांची पाठ, मनपाच्या तिजोरीत फक्त साडे नऊ कोटी…

नगर : महापालिकेने थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिलेल्या ७५ टक्के शास्तीमाफीच्या सवलतींचा दि. २९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या सुमारे महिनाभराच्या कालावधीत ८ हजार २४ जणांनी लाभ घेत १३.३४ कोटींचा कर भरणा केला. त्यापोटी या थकबाकीदारांनी ३.४६ कोटींची सवलत घेतली तर महापालिकेची ९.८७ कोटींची वसुली झाली आहे. मनपाचे थकबाकीचे प्रचंड प्रमाण पाहता सवलत योजनेला नागरिकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट होते. मुदतवाढ दिल्यानंतरही प्रतिसाद थंडाच आहे. बड्या थकबाकीदारांनी सवलतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे आता थकबाकी वसुलीसाठी कोणती कठोर पावले उचलतात याकडे लक्ष राहील.

आयुक्त पंकज जावळे यांनी दि. २९ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या काळात ७५ टक्के शास्तीमाफीची योजना जाहीर केली होती. या काळात ४ हजार ४१३ जणांनी ९.३६ कोटींची थकबाकी जमा करत त्यापोटी २.६५ कोटींची सवलत घेतली होती. यातून महापालिकेच्या तिजोरीत ६.७० कोटीची भर पडली होती. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर पुन्हा शास्तीमाफी योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, यातून अवघी ३.१७ कोटींचीच वसुली झाली आहे. शास्तीमाफी योजनेची ही अखेरची संधी असल्याचे आयुक्त जावळे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता थकबाकीदारांवर मनपाकडून कठोर कारवाई होण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles