नगर महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी मुंबई मंत्रालयावर लाँग मार्च निघाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत आमदार जगताप यांनी तोडगा काढून लाँग मार्च स्थगित केला होता. नागपूर हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार जगताप यांनी पुन्हा पाठपुरावा केला. त्यानुसार पवार यांच्या अध्यक्षतेखाली या मुद्यांवर बैठक झाली.
नगर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होईल. याशिवाय सफाई कामगारांचा वारस हक्काचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत असून हा प्रश्न संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांचा आहे. यावर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.
नगर महापालिका कार्यक्षेत्रातून सुमारे १३ किलोमीटरचे सीना नदीचे पात्र असून, नदीची हद्द निश्चित झाली आहे. आता सीना नदीचे पात्र मातीने भरलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका आहे. याचा फटका शहरवासियांना बसू शकतो. यासाठी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण व्हावे यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा आमदार जगताप करत होते.
त्यांनी प्रत्यक्षात येऊन सीना नदीची पाहणी केली होती. त्यानुसार प्रस्ताव तयार केला असून, त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी उपलब्ध व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. सीना नदीच्या खोलीकरणासाठी लवकरच निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन यावेळी पवार यांनी दिल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.