नगर : शहर व परिसरात शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. सकाळीही हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या. मात्र त्या काही मिनिटांतच थांबल्या. रात्री साडेआठच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते.
गेल्या आठवडाभरात हवामानात अनेकदा बदल झाले. कडाक्याची थंडी पडल्यानंतर अचानक थंडी कमी झाली व काल रात्रीपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळी अवघ्या काही मिनिटांसाठी पावसाची भुरभुर झाली. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.
हवामानात सातत्याने बदल होत असल्याने थंडी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे डॉक्टर सांगतात. पावसाने आंब्याचा मोहोर, कांदा, द्राक्ष आदी पिकांना फटका बसणार आहे.