दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा धडाका
६२ मद्यपी, १६३ अति वेगाने बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या एकूण २२५ वाहचालकांवर कोतवाली पोलिसांची कारवाई
तीन लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल
अहमदनगर::: कोतवाली पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणार्या चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत ६२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच अतिवेगाने वाहन चालविणे, भर रस्त्यात वाहन लावणे, बेदरकारपणे हयगयीने वाहन चालवून दुसऱ्याचे जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या १६३ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून ३ लाख ३३ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. आगामी सण उत्सवाचा काळ पाहता मध्यपान करून वाहन चालविताना आढळल्यास संबंधित वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.
सण-उत्सवादरम्यान काही अतिउत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करतात. तसेच मद्यपान
करून वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात व त्यातील मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच दारू पिऊन वाहन चालविणारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कोतवाली पोलिसांनी मागील सहा महिन्यांमध्ये विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली आहे. त्या अनुषंगाने पोलिस
ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नाकाबंदी दरम्यान वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मद्यपान करून वाहन चालविणे स्वतःसाठी व इतरांसाठी धोकादायक असून नागरिकांनी स्वतः व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहन कोतवाली पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान श्रीकांत खताडे गुलाब शेख अनुप झाडबुके अशोक सरोदे सुनील भिंगारदिवे दीपक बोरुडे संदीप साठे भारत गाडीलकर सचिन गायकवाड पोपट खराडे आदींनी केली.