प्रतिनिधी : नगरचे सिव्हिल हॉस्पिटल कायम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पारनेर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयीन कोठडीत असलेला भाजप कार्यकर्ता आरोपी विजय सदाशिव औटी याचा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आलिशान मुक्काम सुरू असल्याचा प्रकार बुधवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते किरण काळे यांनी भांडाफोड करीत उजेडात आणला. भाजप आरोपीची शाही बडदास्त सुरू असल्याची माहिती समजताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह यावेळी त्यांनी थेट सिव्हील हॉस्पिटल गाठले. कार्यकर्त्यांसह काळे दाखल झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयाच्या सीएमओ यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला.
याची कुणकुण लागतातच ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी खाजगी गाड्यांची व्यवस्था करत अवघ्या दहा मिनिटांत आरोपी औटीला मागच्या दाराने गाडीत घालत रुग्णालयातून रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी पोबारा केला. ही ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती आहे. पाटीलला पुण्याच्या ससून शासकीय रुग्णातून पोलिसांनीच पळवून लावल्याचा आरोप आहे. तशाच पद्धतीने औटीला पळवून लावण्याचा ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांचा डाव होता, असा गंभीर आरोप काळे यांनी यावेळी केला. मात्र आम्ही सतर्कता दाखवल्यामुळे पोलिसांचा इरादा कार्यसिद्धीस जाऊ शकला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष इंजि. सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे आदींसह मविआचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेची माहिती मिळताच किरण काळे यांनी ड्युटीवर असणाऱ्या रुग्णालय प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरले. प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना काळे म्हणाले की, आम्ही आधी ड्युटीवर असणाऱ्या सीएमओ यांना आरोपीला आलिशान सुविधा का दिला जात आहेत ? बिर्याणीने त्याचा पाहुणचार का केला जात आहे ? त्याला फोन कोण पुरवत आहे ? तो मोबाईल वरून कोणाशी संपर्क साधत आहे ? आरोपी औटी मोबाईलवरून रुग्णालयात असताना देखील बोलत असल्याचा फोटोच त्यांनी पुरावा म्हणून दाखवला. मात्र या सर्व गोष्टींवर कोणती ही उत्तरं सीएमओ देऊ शकले नाहीत. त्यांची बोबडी वळाली.
रात्रीतून व्हाया पारनेर ग्रामीण रुग्णालयात ते सबजेल प्रवास :
किरण काळे मविआ कार्यकर्त्यांसह सिव्हीलमध्ये दाखल झाल्याचे कळताच पडद्यामागून सूत्रे वेगवान हलली. आलिशान, महागड्या खाजगी गाड्या रुग्णालयात बोलविल्या गेल्या. मागच्या दाराने भाजप कार्यकर्ता आरोपी औटीला पोलिसांनी गाडीत घातले. समोर यावेळी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मविआचे ठिय्या आंदोलन सुरू होते. पुढे आंदोलन सुरू असतानाच प्रशासनाने संगनमत करत त्याला सिव्हिलमधून बाहेर काढले. स्वतः ड्युटीवरच्या महिला कर्मचाऱ्यांनी आठ वाजून तेरा मिनिटांनी तो इथून बाहेर पडल्याची कबुली फेसबुक लाईव्ह चालू असताना दिली. त्यानंतर काहीच वेळात रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी आरोपी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पोहोचला. तिथे त्याला ऍडमिट करून घेतले गेले नाही. त्याने तिथे देखील आपले पोट दुखत असल्याचे तक्रार केली. शेवटी त्याला पोलिसांनी पारनेरच्या सबजेलमध्ये रात्रीच्या अंधारात दाखल केले.