Tuesday, September 17, 2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता जिल्हा प्रशासन मैदानात

*पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यासाठी शनिवार व रविवारी विशेष कॅम्पचे आयोजन*

*कॅम्पला ज्येष्ठ नागरिकांचा भरभरून प्रतिसाद*

*जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विविध कॅम्पला भेटी*

अहमदनगर :- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेला जिल्ह्यात महिला लाभार्थ्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. या योजनेच्या यशस्वीतेनंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी शनिवार व रविवार दोन दिवस जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये यशस्वीपणे कॅम्प घेण्यासाठी नियोजन केलेले आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजने करिता प्रत्येक तहसिलनिहाय १५ हजार अर्ज घेण्याबाबत लक्षांक दिले असून संपूर्ण जिल्हाभरातून दोन लाख पात्र अर्ज घेण्याबाबत सर्व यंत्रणांना आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना विविध सहाय्यभूत साधने घेण्याकरिता ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र संबंधितांकडून अर्ज भरून घेण्याकरिता दोन दिवसाच्या कॅम्पचे आयोजन प्रत्येक गावामध्ये करण्यात आले आहे.
या कामासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग व आरोग्य विभाग,समाजकल्याण विभाग,महसूल विभाग व नगरपालिका प्रशासन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी गावोगावी जाऊन मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज भरून घेत आहेत.
*पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील कॅम्पला जिल्हाधिकाऱ्यांची भेट*
मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी संपूर्ण जिल्हाभरात दोन दिवशीय कॅम्पचे आयोजन करत लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवादही साधला. या दोनही योजनांचे नोडल अधिकारी सहायक आयुक्त राधाकिसन देवढे हे ही यावेळी उपस्थित होते.
*ज्येष्ठ नागरिकांच्या कॅम्पला भरभरून प्रतिसाद, प्रशासनाचे मानले आभार*
मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी आयोजित विशेष कॅम्पला जेष्ठ नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील कॅम्पमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी श्री सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री येरेकर यांच्यासोबत मनमोकळेपणे गप्पा मारत त्यांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये कोणत्या ठिकाणी जायचे आहे याबाबत माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत त्यांना असलेल्या शारीरिक व्याधी संदर्भात माहिती देत कोणते साहित्य आवश्यक असल्याचेही सांगितले.
जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या या दोन्ही योजनेच्या कॅम्पला जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनाच्या संवेदनशीलतेविषयी आभार व्यक्त केले आहेत.
*अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा सत्कार*
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुख कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सत्कार करत त्यांच्या या कामाचे कौतुकही केले.
जिल्ह्यात आयोजित या दोन दिवशीय कॅम्पमध्ये गावपातळीवर अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक तलाठी, प्रत्यक्ष सहभागी झाले असून जिल्हा परिषदेचा ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन यांच्यासह सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुकास्तरीय प्रमुख कॅम्प यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष भेटी देत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles