अहमदनगर :- ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह देशाच्या सर्वांगिण विकासामध्ये बारा बलुतेदारांचा मोठा वाटा आहे. या बलुतेदारांच्या परंपरागत व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक कारागिरांपर्यंत पोहोचवावा. योजना राबविण्यामध्ये जिल्ह्याने उच्चांक प्रस्थापित करत योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा राज्यात अग्रेसर रहावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबाबत परिसंवाद व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते. व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, राष्ट्रीय सुकाणू समितीचे सदस्य अभय आगरकर ,सचिन पारखे, कौशल्य विभागाचे सहायक संचालक नि.ना. सुर्यवंशी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनिल शिंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष नवले, लघु सूक्ष्म उद्योगाचे सहायक संचालक, सुनील पुसणारे, बी.आर.मुंडे, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, पारंपरिक शिल्पकार व कारागिरांना मदत व्हावी, त्यांच्या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत व्यवसायासाठी अर्थसहाय उपलब्ध करुन देत त्यांचे जीवनमान उंचवावे या हेतुने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरु करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात एक हजार 6000 पेक्षा अधिक गावे आहेत. प्रत्येक गावांमध्ये अनेक पारंपरिक शिल्पकार व कारागीर आहेत. प्रत्येक गावातील शिल्पकार व कारागीरांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी योजनेची अधिक व्यापक स्वरुपात जागृती करावी. योजनेची माहिती प्रत्येक कारागिरापर्यंत पोहोचविण्यात येऊन कारागिरांची योजनेसाठी नोंदणी करुन घ्यावी. योजनेच्या लाभापासुन एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपला जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्येसुद्धा आपला जिल्हा अग्रेसर राहील यादृष्टीने योजनेच्या अंमलबजावणीचे नियोजन करावे. राज्यासह देशामध्ये एक आदर्श निर्माण होईल, यादृष्टीने सर्वांनी समन्वयाने काम करावे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, अभय आगरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील कारागिरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती