प्रतिनिधी : शहरातील चाळीस हजार व्यापारी, दुकानदारांकडून व्यावसायिक परवाना शुद्ध वसुली करू नये या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली मनपा कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. यावेळी वसुलीचा स्थायी समिती, महासभेचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी पायदळी तुडवत मनपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी मनपा निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या.
किरण काळे म्हणाले, काहींनी बाजारपेठ उध्वस्त करण्याची सुपारी घेतली आहे. स्थायी समितीची सोमवारी पुन्हा तातडीची दुसरी बैठक झाली. या बैठकीतही व्यापाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती ब्र सुद्धा काढला गेला नाही. स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्पाचे काम ठेकेदारानी अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे केले आहे. विजेच्या बिलामध्ये लाखो रुपयांची बचत होण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्यात कोणतीही बचत झालेली नाही.
काळे पुढे म्हणाले, मनपा आयुक्तांचा रिमोट कंट्रोल हा कुणाच्या हातात आहे हे नगरकरांना माहित आहे. आयुक्त कटपुतली म्हणून वागत असून इतरांच्या इशाऱ्यावर व्यापाऱ्यांना वेठीस धरत आहेत. खासदार हे नगर शहराचे देखील खासदार आहेत. त्यांच्याकडे घरात पालकमंत्री पद आहे. राज्यात त्यांची सत्ता आहे. आमदार, खासदार एका विचारांचे आहे. निर्णय घेण्यासाठीचे सगळी सत्ता त्यांच्याकडे आहे. खासदार त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे कपडे फाडण्याची भाषा करतात. त्यांना कपडेच फाडण्याचा छंद होता, तर त्यांनी डॉक्टर, खासदार होण्यापेक्षा टेलर व्हायला हवे होते. सत्ताधाऱ्यांच्या अन्यायकारक निर्णयामुळे माञ शहरात चाळीस हजार दुकानदारांचे परवाना शुल्क वसुलीच्या निर्णयामुळे कपडे फाटण्याची वेळ आली आहे.
भिंगारच्या मनपा हद्दीतील समावेशावरून काँग्रेसने साधला निशाणा :
यावेळी मनपाला संतप्त सवाल विचारताना काळे म्हणाले की, भिंगार कॅन्टोन्मेंट बरखास्त करून मनपा हद्दीत समावेशाची प्रक्रिया सुरू आहे. हा समावेश करून भिंगार मधील व्यापारी, दुकानदारांना देखील परवाना शुल्क लागू केले जाणार आहे. त्यांना ही भुर्दंड पडणार आहे. यापूर्वी मनपा हद्दीत समाविष्ट केलेली लगतची गावे, परिसर यांना अनेक वर्ष उलटून देखील साधे रस्ते, पाणी, पथदिवे, गटारी या मूलभूत सोयी सुविधा मनपा देऊ शकलेली नाही. भिंगारकरांची मनपात समावेशाबाबत जी काही जनभावना असेल त्या बाजूने काँग्रेस भिंगारकरांच्या पाठीशी उभी आहे.
यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, फैय्याज शेख, उषाताई भगत, सुनीताताई भाकरे, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, चंद्रकांत उजागरे, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, अल्तमश जरीवाला, गणेश आपरे, अभिनय गायकवाड, आनंद जवंजाळ, इंजि. सुजित क्षेत्रे, किशोर कोतकर, सोफियान रंगरेज, गणेश चव्हाण, विजय चौथे, रियाज सय्यद, अजय रणसिंग, दर्शन अल्हाट, बिभीशन चव्हाण, समीर शेख, गौरव घोरपडे, आप्पासाहेब लांडगे, मुस्तफा शेख, अमोल गायकवाड, ज्ञानेश्वर बोरुडे, दीपक काकडे, बाबासाहेब वैरागळ, बापूसाहेब धिवर, रोहिदास भालेराव आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.