प्रतिनिधी : राज्यात सध्या गाजत असणाऱ्या नगर मधील अल्पवयीन मुलांच्या धिंड प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सुपारी घेतल्याच्या रागातून धिंड काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काहींच्या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी दिलाचा आरोप अर्ध नग्न प्रकरणातील आरोपींनी केला होता. याबाबत काळे यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे आणि गंभीर आरोप केले आहेत. काळे म्हणाले, मी कुणाची सुपारी दिली नसून विधानसभेच्या निवडणुकीत मी उमेदवार म्हणून रिंगणातच दिसू नये म्हणून माझा खून करत मला कायमचा बाद करण्यासाठी माझ्याच हत्येचा कट शिजवला जात असल्याचा मला दाट संशय आहे. शिवसैनिकांच्या केडगाव हत्याकांडाची पुनरावृत्ती करत माझी हत्या काही लोकांना करायची आहे असे यातून दिसते. गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना लेखी निवेदन पाठवून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी नगरसेवक संजय झिंजे, उपाध्यक्ष अलतमश जरीवाला आदी उपस्थित होते. शहरात काही लोक स्वतःला कार्यसम्राट समजतात. राजकारणात विरोधकाला राजकीय पद्धतीने जरूर विरोध करावा. मात्र त्याचा अशा प्रकारे कायमचा काटा काढण्यासाठी षडयंत्र रचू नयेत. शहरातील राजकारणाची पातळी अत्यंत खालच्या स्तराला गेली आहे. मात्र अशा प्रकारांना घाबरून शहर भयमुक्त करणे आणि विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे माझे काम यतकिंचितही थांबणार नाही. नगरकरांच्या भल्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील, असा सज्जड इशारा काळे यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना दिला आहे.
माझ्या नावाचा गैरवापर करत कोणी तीस लाखांची सुपारी दिली ? कधी, कुठे दिली ? यासाठी कुठला ॲडव्हान्स दिला गेला आहे का ? तो कोणी फायनान्स केला ? त्याॲडव्हान्स मधून रीवॉलव्हर घेण्यात आली आहे का ? असेल तर कुठून घेतले आहे ? कोण अवैद्य हत्यारांचा पुरवठा करत आहे ? या सगळ्यांचा पोलिसांनी तपास करावा. यासाठी ताब्यात असणारे, फरार झालेले दोन्ही गटांचे आरोपी यांचे सीडीआर, एसडीआर, टॉवर लोकेशन, कॉल रेकॉर्डिंग काढण्यात याव्यात. यांनी कुणाची भेट घेतली, ते कोणा कोणाच्या संपर्कात आहेत. ते ज्यांच्या संपर्कात आहेत ते अन्य कोणाच्या संपर्कात आहेत, या सगळ्याचा धागा दोरा शोधून काढून खऱ्या मास्टरमाईंड पर्यंत पोलीसांनी पोहोचावे आणि संभाव्य हत्याकांड घडू नये यासाठी सखोल तपास करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने काळे यांनी केली आहे.
माझेही कॉल डिटेल्स तपासा :
या प्रकरणातील दोन्ही गटातील कोणत्याही आरोपींशी माझा केव्हाही संपर्क आलेला नाही. भेट झालेली नाही. अशा लोकांशी मी का संपर्क ठेवू ? असे चुकीचे संस्कार माझ्यावर नाहीत. याची शहानिशा करण्यासाठी माझेही कॉल डिटेल्स, सीडीआर पोलिसांनी तपासावेत. लगेच दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असे किरण काळे यांनी पोलिसांना जाहीर आवाहन केले आहे.