Tuesday, April 29, 2025

अहमदनगरमध्ये ‘राष्ट्रवादीच्या बॅनरला काँग्रेसचे जोडे मारो अंदोलन’

प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या मनपा महासभेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे असणारे पण विरोधी पक्षनेते पदावर असणारे नगरसेवक संपत बारस्कर यांनी व्यापारी कधीपासून गरीब झाला ? व्यापारी गरीब असतो का ? व्यापारी गरीब झाला म्हणजे आपण (इतर सगळे) भिकारी झालो, असे म्हणत शहरातील सुमारे ४० हजार व्यापारी, दुकानदारांचा अवमान केल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी व्यापाऱ्यांनी पैसे भरलेच पाहिजेत, असं म्हणत परवाना शुल्क वसुलीसाठी सभागृहात आग्रह धरला. यावरून काँग्रेसने आडते बाजार, दाळ मंडई येथे राष्ट्रवादीच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा बोलविता धनी कोण आहे हे नगरकरांना माहित आहे, असा घाणाघात यावेळी बोलताना काळे यांनी केला.

यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, अलतमश जरिवाला, गणेश चव्हाण, चंद्रकांत उजागरे, उषाताई भगत, सुनीताताई भाकरे, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, विकास भिंगारदिवे, गौरव घोरपडे, इंजि. सुजित क्षेत्रे, किशोर कोतकर, प्रशांत जाधव, सुधीर लांडगे, सोफियान रंगरेज, रियाज सय्यद, शंकर आव्हाड, रोहिदास भालेराव, राहुल सावंत आदींसह काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी “व्यापाऱ्यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी गद्दार गटाचा निषेध असो”, “व्यापाऱ्यांवर व्यावसायिक परवाना शुल्क वसूली लादणाऱ्या राष्ट्रवादी गद्दार गटाचा धिक्कार असो” या घोषणांनी बाजारपेठेचा परिसर दणाणून गेला होता.

शहर काँग्रेसने सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकांच्या व्यापारी विरोधी वक्तव्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यामुळे व्यापारी, दुकानदारांसह मुख्य बाजारपेठे, सावेडी, केडगाव उपनगरातील व्यावसायिक यांच्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे म्हणताना दिसत आहेत की, व्यापाऱ्यांकडून वसुलीचा निर्णय कायम राहू द्या. व्यापाऱ्यांनी पैसे भरलेच पाहिजेत. हे सगळ्या सुविधा घेतात. स्ट्रीट लाईट, ड्रेनेज लाईन, स्वच्छतेचे कर्मचारी ते घेतात. तर नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणताना दिसत आहेत की, बाजारपेठेचे, व्यापारी यांचे कंबरडे मोडले आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण ८० ते ९० टक्के कमी झाले आहे. त्यामुळे व्यापार वाढीसाठी मनपाने व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

याचा खरपूस समाचार किरण काळे यांनी आंदोलना वेळी घेतला. ते म्हणाले, व्यापाऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवणारे भागानगरे हे स्वतःच व्यापारांकडून व्यावसायिक परवाना शुल्क वसुलीच्या महासभेतील मंजूर ठरावाचे सूचक आहेत. ते स्वतः सारसनगर या शहर लोकप्रतिनिधी यांच्या प्रभागातील आहेत. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे डबल ढोलकी आहे. राष्ट्रवादीची नाटकबाजी सुरू आहे. विरोधी पक्षनेते बारस्कर यांनी तर व्यापाऱ्यांचा अवमान केला आहे. नगरसेवक कुमार वाकळे यांनी व्यापाऱ्यांनी पैसे भरलेच पाहिजेत. हा धरलेला आग्रह हा त्यांचा वैयक्तिक आग्रह नसून राष्ट्रवादीच्या या तीनही नगरसेवकांचा खरा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. शहर लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून तसेच मनपा सत्तेच्या आडून बाजारपेठ उध्वस्त करू पाहत आहेत काय ? काही लोकांना ताबेमारीतून बिल्डर लॉबी शी असणाऱ्या संगनमतातून सुरू असणाऱ्या मोठमोठ्या स्कीमच्या गाळ्यांना व्यापारी गिऱ्हाईक म्हणून हवे आहेत. म्हणून बाजारपेठ उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे असा गंभीर आरोप करत काळे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटावर सडकून टीका केली.

अन्य कुणी ४० हजार व्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहणार नसले तरी देखील शहर काँग्रेस व्यापाऱ्यांचा हात सोडणार नाही. ज्या पद्धतीने रेल्वे माल धक्क्यावरील माथाडी कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासूनचे थकीत कोट्यावधी रुपयांचे वेतन मिळवून देण्यासाठी काँग्रेसने यशस्वी लढा लढला त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना देखील या जाचक वसुलीतून सुटका मिळवून देण्याचे काम शहरात काँग्रेस नक्की करेल, असा विश्वास यावेळी बोलताना काळे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles