राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून विधानसभेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी नगर शहर आणि श्रीगोंद्याची जागा काँग्रेसला सोडावी, अशी आग्रही मागणी जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्याकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा काँग्रेसचे शिष्टमंडळाने पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेवून नगर शहर आणि श्रीगोंद्याची मागणी केली आहे.
यामुळे काँग्रेस कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून राष्ट्रवादीने या दोनही जागा काँग्रेससाठी सोडव्यात, असे साकडे पवार यांना घालण्यात आले आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत संपत म्हस्के, प्रताप शेळके, बाबासाहेब गुंजाळ हजर होते. यावेळी पवार यांनी शिष्टमंडळासोबत सुमारे एक तास चर्चा केली असून दोनही मतदारसंघातील स्थितीची माहिती घेतली. लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची शक्ती दिसून आली आहे. विशेष करून नगर शहरात आणि श्रीगोंदा तालुक्यात पक्षाला मोठी संधी आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी दिवसरात्र एक केला आणि एकएक उमेदवार निवडून आणला. यामुळे भाजप आणि मित्र पक्षांचे पानिपत झाले.
नगर जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता जिल्ह्यात खासदारकीच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीने मिळवल्या. आपले दोन्ही उमेदवार जायंट किलर ठरले. यामुळे नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना त्यात विशेषतः काँग्रेसला उभारी मिळाली आहे. काँग्रेस पक्षाला नगर आणि श्रीगोंदा या जागा मिळाल्या तर या मतदारसंघात काँग्रेसला खाते उघडता येईल, असे वाघ यांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. दिवंगत नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांचा शरद पवार यांच्याशी संपर्क होता. यावेळी चर्चेदरम्यान शरद पवार यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह वाघ यांच्या आठवणींना उजाळा दिला.