काँग्रेसचा गंभीर आरोप,
भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा भाजपला मोदी मोठे वाटतात हे संतापजनक – किरण काळे
ऑडिओ क्लिपनंतर आता नगर शहर काँग्रेसने भाजप प्रदेशाध्यक्षांचा वादग्रस्त व्हिडिओ केला व्हायरल
——————————————————————-
प्रतिनिधी : आपल्या संस्कृतीमध्ये मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताच्या पवित्र भूमीला आपण भारत माता म्हणतो. प्रभू श्रीराम हे भारतवासीयांच्या मनामनामध्ये वसलेले आहेत. सर्वांच्या मनामध्ये भारत माता, प्रभू श्रीरामांबद्दल नितांत आदराची भावना आहे. भाजपला माञ भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात हे संतापजनक आहे. म्हणूनच नगर शहर दौऱ्यावर आले असता प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून उपस्थितांना नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावण्याचा निंदनीय किळसपणा प्रकार घडला. प्रभू श्रीरामांची घोषणा सुरू असताना त्यांना मात्र ती द्यावीशी वाटली नाही, असे म्हणत भाजपचे हिंदुत्वाचे आणि देशा प्रतीचे प्रेम बेगडी असल्याचा आरोप नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
आ. बावनकुळे नुकतेच नगरमध्ये येऊन गेले. यावेळी पत्रकारांसंदर्भात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप राज्यभर चांगलीच व्हायरल झाली. त्याचा राज्यभर निषेध सुरू असताना त्यातच अहमदनगर शहर काँग्रेसने आता बावनकुळेंचा वादग्रस्त व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला आहे. सोशल मीडियात तो चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे भाजपला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करण्यापूर्वी हातामध्ये भारत माता, प्रभू श्रीराम, भारतीय संविधान उद्देशपत्रिकेचे फोटो झळकवत त्यांचा जयघोष काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी दंडाला काळ्या फिती बांधून भाजपच्या विकृत मनोवृत्तीचा काँग्रेसने निषेध केला.
काँग्रेसने उघड केलेल्या व्हिडिओमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मोदींचे फोटो असलेली पत्रके वाटताना दिसत असून मोदींच्या नावाच्या घोषणा उपस्थितांना द्यायला सांगत आहेत. यावेळी भारत माता की जय अशी घोषणा देणाऱ्याला त्यांनी हात करून घोषणा बंद करायला सांगत मोदींची घोषणा द्यायला सांगत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा प्रकार नगर शहरात एकदा नव्हे तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे दोन स्वतंत्र व्हिडिओ काँग्रेसने उघड केले आहेत. हा भारत मातेचा, प्रभू श्रीरामांचा अवमान असून त्यामुळे तमाम हिंदूंसह सर्व भारतवासी देश प्रेमींच्या भावना दुखावल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, रतिलाल भंडारी, गणेश चव्हाण, अलतमश जरीवाला, अजय मिसाळ, किशोर कोतकर, फैयाज शेख, आकाश आल्हाट, आनंद जवंजाळ आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.