अहमदनगर – उन्हामुळे दुधाच्या दरात तीस टक्क्यांपर्यंत घट झाली. पाणीटंचाई, चाऱ्याचा प्रश्न, पशुखाद्याचे वाढते दर यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीला आलेला असताना काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढविलेले गाईच्या दुधाचे दर बहुतांश दूध संघांनी पुन्हा दोन रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटरचा २९ रुपयांचा दर पुन्हा २७ रुपयांवर आला आहे.
दोन रुपये दर कमी केल्यापासून दूध उत्पादकांना दर दिवसाला तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक तर शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार ३४ रुपये दर दिला जात नसल्याने प्रति लिटरला सात रुपयांप्रमाणे दररोज १५ कोटी रुपयांपेक्षा आर्थिक फटका बसत असल्याने दूध उत्पादक पुरते हैराण झाले आहे.
राज्यात गाईच्या दुधाचे साधारणपणे दोन ते सव्वादोन कोटी लिटरपर्यंत संकलन होत असते. साधारणपणे कमी पाणी उपलब्धता असलेल्या भागातील शेतकरी शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय करतात. नगरसह नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांत तीव्र उन्हाळा असल्याने व उष्माची तीव्र आहे. बहुतांश भागात पाण्याची टंचाई आहे.
त्याचा थेट परिणाम दूध व्यवसायावर होताना दिसत आहे. उष्मामुळे साधारणपणे तीस ते चाळीस लाख लिटरपर्यंत दुधात घट झाली आहे. नगरसह उन्हाळ्यात लग्नसोहळे व अन्य कार्यक्रमामुळे दुग्धजन्य पदार्थाला मागणी अधिक असते.
राज्य शासनाच्या अनास्थेमुळे दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. साधारण पस्तीस रुपये दर मिळावा. कारण चारा, पशुखाद्याचे दर वाढताना दूधदर कमी करत असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हा व्यवसाय कसा करावा, असा प्रश्न आहे.
– देविदास पिसे, दूध उत्पादक, मोहोज देवढे, ता. पाथर्डी, जि. नगर