अहमदनगर-पूर्ववैमनस्यातून युवकावर धारदार हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. 3) सायंकाळी बोल्हेगाव उपनगरात घडली. यश कृष्णादास पाटील (वय 21 रा. नागापूर) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान त्यांनी मंगळवारी (दि. 4) तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून योगेश सखाराम गायकवाड (रा. मोरया पार्क, जुनी पोलीस कॉलनी, बोल्हेगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सखाराम गायकवाड हा यश पाटील यांच्याकडे खानावळी म्हणून होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याची खानावळी व घरी येणे-जाणे बंद केल्याने त्याचे व पाटील कुटुंबाचे वाद झाले होते. या वादाची फिर्याद यश यांच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती.
सोमवारी सायंकाळी योगेश गायकवाड याने फिर्यादीच्या घरी येऊन त्यांच्या आईला शिवीगाळ केले. त्यानंतर फिर्यादी, त्यांची आई, बहिण व काका त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता त्याने धारदार हत्याराने फिर्यादी व त्यांचे काका अनिल काळे यांच्यावर हल्ला केला. फिर्यादीच्या आईला मारहाण केली. हल्ल्यात फिर्यादी यांना जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.