अहमदनगर -आधी कारला कट मारला आणि नंतर कार आडवी लावून बांधकाम व्यावसायिकाला शिवीगाळ करत त्यांच्या मुलाला मारहाण केल्याची घटना भिस्तबाग महाल परिसरात रविवारी (दि. 9) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. देवांश जितेंद्र बिहाणी (रा. बांगडीवाला हाऊस, भिस्तबाग महाल, सावेडी) असे मारहाण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे नाव आहे.
देवांश यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल फणसे (पूर्ण नाव माहीत नाही), सचिन शिंदे (रा. वैदूवाडी, सावेडी) व दोन अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देवांश व त्यांचे वडील जितेंद्र बिहाणी हे दोघे कारमधून जात असताना त्यांच्या कारला समोरून आलेल्या कारने कट मारला. त्यामुळे देवांश यांनी मोठ्याने आवाज देत कार हळू चालव, असे म्हणाले. त्याचा राग मनात धरून चालकाने कार आडवी लावली. त्यातून चार इसम खाली उतरले. त्यांनी देवांश व जितेंद्र बिहाणी यांना शिवीगाळ केले. त्यांना जितेंद्र यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातील एकाने खिशातील फायटर काढून देवांश यांच्या तोंडावर व नाकावर मारले. त्यात ते जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.