दहावी व बारावीचे बनावट गुणपत्रके, तसेच विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट प्रमाणपत्रे, शाळांचे बनावट दाखले तयार करून ते 50 ते 60 हजार रूपयाला विक्री केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नगरमध्येसमोर आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याकडे आलेल्या चौकशी अर्जावरून हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत नगरमधील एकासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अंमलदार विनोद गिरी यांनी शुक्रवारी (दि. 14) फिर्याद दिली आहे.
नगर शहरातील रूद्र एज्युकेशन सोसायटीच्या पॅरामेडिकल कॉलेज येथील अशोक नामदेव सोनवणे (वय 37 रा. व्दारकाधिश कॉलनी, आलमगीर, भिंगार), दिल्ली येथील सचिन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व चेतन शर्मा (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अशोक सोनवणे याला अटक केली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची (दि. 20) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, त्याच्याकडे सखोल चौकशी करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून दहावी, बारावीच्या प्रमाणपत्रांसह अनेक विद्यापीठांच्या नावांचे बनावट प्रमाणपत्र आढळून येण्याची शक्यता आहे.
विशाल बाजीराव पारधे या तरूणाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे फसवणुक झाल्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. रूद्र एज्युकेशन सोसायटीचे परामेडीकल कॉलेज, बालिकाश्रम रस्ता, न्यु आर्टस् कॉलेज मागे, दिल्लीगेट येथील अशोक सोनवणे याने ‘डीएमएलटी’चे कागदपत्र घेवून विशाल पारधे यांचे ‘बीएसएमएलटी’ या कोर्सला प्रवेश न घेता सात हजार रूपये घेवून ‘बीएसएमएलटी’ची परिक्षा न घेता करोना संसर्गाचे कारण सांगून बनावट व खोटे प्रमाणपत्र देत फसवुणक केली आहे, असे या तक्रार अर्जात नमूद केले होते. पारधे यांच्या अर्ज चौकशीसाठी सोनवणे याला तोफखाना पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि. 13) बोलविले असता त्याला एका कुरिअर कंपनीच्या नगर कार्यालयातून फोन आला.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याच्यासोबत त्या कुरिअर कार्यालयात जावून चौकशी केली असता सोनवणे याच्या सोसायटीच्या नावे दिल्ली येथून एक कुरिअर प्राप्त झाले होते. ते कुरिअर जप्त करत पोलिसांनी त्याची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये काही प्रमाणपत्रे, मार्कशीट, दाखले मिळून आली. सदर कुरिअरच्या लिफाफ्यामध्ये महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे यांच्याकडील इयत्ता दहावी, बारावीचे प्रमाणपत्र मिळून आले. याबाबत सोनवणे याच्याकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले की, हे प्रमाणपत्रे बनावट असून ते मी दिल्ली येथील सचिन व चेतन शर्मा यांच्याकडून तयार करून घेतले आहे. ते प्रमाणपत्र 50 ते 60 हजार रूपयांना आलेल्या ग्राहकांना विक्री केले आहे, असे सांगिल्याने पोलिसांनी सर्व प्रमाणपत्र जप्त करून सोनवणे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, शरद दाते, विनोद गिरी, संपदा तांबे यांच्या पथकाने केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत