चंदनापुरी घाटात अवघ्या 15 वर्षांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या करणार्या तरुणाने दारूच्या पैशासाठी आपल्या आईचाही जानेवारी महिन्यात खून केला होता अशी धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तुषार विठ्ठल वाळुंज (रा. लक्ष्मीनगर, ता. संगमनेर) याला पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणात काल अटक केली आहे.
पोलिसांच्या तपासामध्ये त्याने आपली आई सखुबाई विठ्ठल वाळुंज यांचा जानेवारी मध्ये खून केला होता असे पोलिसांना सांगितले. आरोपी हा पूर्वी रेकॉर्डवील गुन्हेगार असून तो मानसिक संतुलन बिघडल्यासारख्या पद्धतीने वागतो. आरोपी तुषार वाळुंज याने नऊ दिवसांपूर्वी त्याच्या अल्पवयीन मैत्रिणीची चंदनापुरी घाटात निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर त्यास पोलिसांनी अटक केली. या हत्येची चौकशी करीत असताना त्याने आणखी एक धक्कादायक खुलासा केला. माझी आई जानेवारी माहिन्यात मयत झाली होती. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असे म्हटले होते. मात्र, ती आत्महत्या नव्हती तर तिला देखील मीच मारले होते, असे त्याने जबाबात म्हटले.
तुषार वाळुंज यास अनेक व्यसने आहेत. त्यामुळे त्याच्याकडे आलेला पैसा हा त्याला पुरत नव्हता. म्हणून तो पैशासाठी आईकडे तगादा लावत होता. जानेवारी 2023 मध्ये त्याने आईकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्याच्या आईने दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. त्याच दिवशी तुषारने त्याच्या आईला फाशी दिली. दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी त्याने अल्पवयीन मुलीला गाडीवर घेतले आणि फिरण्यासाठी ते चंदनापुरी घाटात गेले. तेथे जाऊन त्यांनी मद्य प्राशन केले आणि त्यानंतर यांच्यात वाद झाले. आपण डोंगरावर जाऊ असेेे तो तिला म्हणाला. तिने नकार दिला तरी देखील त्याने तिला बळजबरी डोंगरावर नेले. दोघे मद्याच्या नशेत असल्यामुळे तुषारने तिच्या डोक्यात दगड टाकला. जेव्हा ती मयत झाली हे लक्षात आले तेव्हा तिचा चेहरा ओळखता येऊ नये म्हणून तिच्या चेहर्यावर दगडाने जखमा केल्या. त्यानंतर तो तेथून निघून आला. या खुनाचा तपास चालू असतानाच त्याने आईचाही खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहेे.