घराचे बांधकाम करताना जवळ असणार्या उच्च विद्युत वाहिनीचा वीजपुरवठा वेळोवेळी काही काळासाठी बंद ठेवण्यासाठी प्रत्येकी पाचशे असे पाच वेळांसाठी अडीच हजार रुपयांची लाच घेणार्या वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
संतोष शांतिनाथ अष्टेकर (41, रा. खाडेनगर, जामखेड) असे पकडण्यात आलेल्या संशयित वायरमनचे नाव आहे. तो विद्युतवितरण कंपनीच्या जामखेड उपकेंद्रात बाह्यस्त्रोत वायरमन म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांचे खाडेनगर परिसरात घराचे बांधकाम सुरू आहे. या प्लॉटसमोरून वीजवितरण कंपनीची विद्युत वाहिनी आहे. विद्युतपुरवठा चालू असताना बांधकाम करताना विजेचा धक्का लागून धोका होण्याची शक्यता असल्याने काम सुरू असेपर्यंत किमान 2 तासांसाठी या वाहिनीचा विद्युतपुरवठा खंडित करण्याची विनंती तक्रारदार यांनी अष्टेकर यांच्याकडे केली होती.
त्याची फी म्हणून अष्टेकर याने प्रत्येक वेळासाठी 500 रुपये याप्रमाणे पाच वेळेसाठी अडीच हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. याप्रकरणी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार विद्युत रोहित्राजवळ सापळा रचून पैसे स्विकारताना अष्टेकर यास रंगेहाथ पकडण्यात आले.त्यावर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शरद गोर्डे, कर्मचारी रमेश चौधरी, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रुक यांनी यशस्वी केला.