अहमदनगर : फोनवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.दोघे एकत्र राहू लागले. तरुणीने लग्नासाठी आग्रह धरल्याने दोघांमध्ये वाद होऊन ते वेगळे झाले. दरम्यान, वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी एकावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भूषण प्रकाश केदार (वय २९, रा.पाथरवाला, ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीची २०१९ मध्ये आरोपीशी फोनवरून मैत्री झाली. तो तिला भेटण्यासाठी आला. दोघांच्या गाठीभेठी वाढल्या. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तो तिला घेऊन त्याच्या रुमवर गेला. तेंव्हापासून हे दोघेही एकत्र राहत होते. बरेच दिवस एकत्र राहिल्यानंतर २०२३ मध्ये तरुणीने लग्नासाठी आग्रह धरला. त्यावर त्याने आपले लग्न माझ्या आई-वडिलांना मान्य नाही. त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तो त्याच्या गावी पाथरवाला येथे निघून गेला. फिर्यादी मुलगी त्याच्या घरी गेली असता तिला जातीवाचक शिवीगाळ करून हाकलून देण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.