शाळा- कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्या तीन अल्पवयीन मुलींची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर शहर व उपनगरात या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पीडितांनी शनिवारी (24 ऑगस्ट) पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत. पीडितांच्या फिर्यादीवरून विनयभंग, पोक्सो आदी कलमानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात एक व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, बदलापूर येथील घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असताना नगर जिल्ह्यातही महिला- मुलींवरील अत्याचार होत असलेल्या घटना थांबायला तयार नाहीत.
नगरमध्ये राहणार्या अल्पवयीन मुलीने (वय 16) दिलेल्या फिर्यादीवरून गौरव बापू ठोंबे (रा. वंजारगल्ली, मंगलगेट) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलीची गौरवसोबत ओळख असून ते दोघे मित्र आहेत. 20 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास गौरवने फिर्यादीला फोन करून मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून बोलावून घेतले व दुचाकीवरून कॉफी घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये नेले. तेथे गेल्यानंतर गौरवने तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे चाळे केले. ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु माझ्याशी लव्हशीप ठेवली नाही तर मी तुला जगू देणार नाही’, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने घाबरून तिच्या घरी सर्व घटना सांगितली व तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक यू. एन. राजपूत अधिक तपास करत आहेत.
नगर तालुक्यातील एका गावात राहणार्या अल्पवयीन मुलीने (वय 14) शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य अनिल शिंदे (रा. गौतमनगर, भिंगार), रोहित राजू आल्हाट, विश्वानंद मारूती बनसोडे (दोघे रा. वडारवाडी, भिंगार) व प्रेम अंकुश जाधव (रा. सौनिकनगर, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी अल्पवयीन मुलगी 10 ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर नगर- पाथर्डी रस्त्याने घरी जात असताना साडेअकरा वाजेच्या सुमारास संशयित चार आरोपी यांनी तिचा पाठलाग केला. तिला हातवारे करून वाहन आडवे लावले. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडिताने शनिवारी दुपारी कॅम्प पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगून फिर्याद दिली.
पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके अधिक तपास करत आहेत. उपनगरात राहणार्या अल्पवयीन मुलीने (वय 16) दिलेल्या फिर्यादीवरून राहुल मारूती आळकुटे (रा. वडारवाडी, भिंगार) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी 21 ऑगस्ट रोजी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास राहुल आळकुटे याच्या दुकानात सामानाचे सुट्टे पैसे मागण्यासाठी गेली होती. तिने राहुलकडे पैसे मागितले असता व तिच्या आई- वडिलांसोबत मागील भांडणाच्या कारणावरून राहुलने तिला दुकानात ओढले. तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.