राहुरी शहरातील राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्थेत सात कोटी सदतीस लाख बासष्ट हजार अठ्याहत्तर रुपये निधीचा संस्थेचा विश्वासघात, फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात काल सोमवारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक, वसुली अधिकारी, दैनिक बचत प्रतिनिधी, कॅशियर, तत्कालीन लेखापरीक्षक अशा अशा एकूण नऊ जणांवर लेखापरीक्षकाच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठितांनी स्थापन केलेेल्या या पतसंस्थेवर शासकीय, शिक्षक, वैद्यकीय व पत्रकार क्षेत्रातील प्रतिष्ठित पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ठेवीदारांनी आपल्या ठेवीसाठी अनेक आंदोलने करून पतसंस्थेची शासकीय लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण करावे, अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार शासकीय लेखापरीक्षण होऊन त्यांच्या निरिक्षणातून पतसंस्थेत सात कोटी सदतीस लाख बासष्ट हजार अठ्याहत्तर रुपये अफारातफर झाल्याचे अहवालात नमुद केले होते. याप्रकरणी लेखापरीक्षकांनी महिन्यापूर्वीच याबाबत फिर्याद दिली होती. मात्र, अपहाराची रक्कम मोठी असल्याने वरीष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मंजुरीनंतर काल दि. 14 नोव्हेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.






