नगर : कौटुंबिक वादातून वडिलांनीच मुलाचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणली आहे. धाकट्या मुलाच्या मदतीने खून केलेल्या मोठ्या मुलाच्या मृतदेहास दगड बांधून तो बुरुडगाव रस्त्यावरील विहिरीत टाकण्यात आला. विशेष म्हणजे वडिलांनीच २० दिवसांपूर्वी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.
गणेश अशोक एकाडे (३१, रा. एकाडे मळा) असे मृताचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी त्याचे वडील अशोक लक्ष्मण एकाडे व भाऊ दिनेश अशोक एकाडे या दोघांना ताब्यात घेतले आहे. आज, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बुरुडगाव रस्त्यावरील, एकाडे मळ्यातील विहिरीत मृतदेह शोधण्याचे काम कोतवाली पोलिसांकडून सुरू होते.
अशोक एकाडे याने १० मे रोजी कोतवाली पोलिसांकडे मुलगा गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलीस अंमलदार डाके व वाघमारे त्याचा तपास करत होते. तपासात तक्रारदाराकडून प्रत्येक वेळी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या माहितीमुळे पोलिसांचा अशोक एकाडेवर संशय बळावला. त्या दृष्टीने पोलीस तपास करत होते. संशयावरून पोलिसांनी परिसरात माहिती घेतली असता, वडिलानेच मुलाला मारल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार दीपक रोहोकले यांना मिळाली होती.
दि. ८ मे रोजी घराच्या गच्चीवर त्याचा खून केला व धाकट्या मुलाच्या मदतीने त्याचा मृतदेह विहिरीत नेऊन टाकल्याचे तपासात उघड झाले. मृत गणेश व त्याच्या वडिलांचा कायम वाद होत होता. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. खुनाचा प्रकार असल्याचे उघड होताच पोलिसांनी एकाडे मळा येथील विहिरीकडे धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.