Sunday, December 8, 2024

Ahmednagar Crime News :चोरट्यांच्या मारहाणीत वृध्दाचा मृत्यू

तिसगाव येथील भडके वस्तीजवळ राहत असलेले मच्छिंद्र ससाणे यांच्या वस्तीवर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास आलेल्या पाच ते सहा चोरट्यांनी शेजारच्या वस्तीवरील घरांच्या दरवाजांना कड्या लावत ससाणे यांच्या घरावर दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांच्या मारहाणीत ससाणे गंभीर झाले. त्यांना आधी तिसगाव आणि त्यानंतर नगरला हलवण्यात आले. दरम्यान, गंभीर जखमी ससाणे यांचा मृत्यू झाला.

तिसगाव येथील भडके वस्तीजवळ राहत असलेले ससाणे (वय 80) यांच्या घराशेजारील गोठ्यातील कोंबड्या व बोकडे चोरून नेण्याचा प्रयत्न करत असतांना, घरात झोपलेले ससाणे यांना जाग आली. त्यांनी विरोध केला असता चोरट्यांनी त्यांना शस्त्राच्या सह्याने मारहाण केली. यात ससाणे गंभीर जखमी झाले. यावेळी चोरट्यांनी हातावर व डोक्यावर लोखंडी तिक्षण हत्याराने वार केले. यावेळी ससाणे यांच्या पत्नीने आरडाओरड केल्यानंतर चोरटे पळून गेले.

काही वेळानंतर ससाणे यांना तिसगाव येथील दवाखान्यात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना नगरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती तिसगावमध्ये समजल्यानंतर तिसगावसह परिसरात घबराट निर्माण झाली. तिसगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत असून मारहाणीचे प्रकार देखील वाढले आहेत.

या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रविवार (दि.8) तिसगावमध्ये निषेध मोर्चा काढून तिसगाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा ससाणे यांच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस अधिक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, निवृत्ती आगरकर उपस्थित होते. तपासाच्यादृष्टीने ओला यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना तपासाबाबत सूचना दिल्या.दरम्यान, वृद्धेश्‍वर चौक व माळीवाडा पेठेकडे जाणार्‍या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता रात्रीच्यावेळी दोन मोटरसायकलवरील अज्ञात पाच ते सहाजण तोंडाला मास्क बांधलेले या रस्त्यावरून जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजच्या माध्यमातून आढळून आले असून फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles