प्रतिनिधी : शहरात खुनी हल्ले, हत्याकांड थांबायला तयार नाही. सावेडीमध्ये जमिनीवर बेकायदेशीर ताबे मारणे, अवैध धंदे यातून राजकीय वरदहस्तातून टोळी युद्ध सुरू आहे. यामुळे नगर शहराची बदनामी होत आहे. शहराचा विकास खुंटला आहे. गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. मुख्यमंत्री साहेब, नगर शहरातील या राजकीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
काळे म्हणाले की, सावेडी उपनगराला लोकांची पसंती असणारी वसाहत म्हणून पाहिले जात होते. मात्र अलीकडच्या काळामध्ये या भागामध्ये विशेषतः प्रभाग १ व २ मध्ये नागरिकांच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या ताबे घालत धुडगूस सुरू आहे. अवैद्य धंद्यांवरून टोळी युद्ध सुरू आहेत. राजकीय पाठबळाच्या माध्यमातून शहराला वेठीस धरले जात आहे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांना रेड कार्पेट वागणूक दिली जात आहे. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची पोलीस केवळ कागदोपत्री पूर्तता करत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. तडीपार, एमपीडीए, मोक्काची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे जरी पोलीस प्रशासन म्हणत असले, तरी देखील प्रत्यक्षात माञ खरे गुन्हेगार शहरामध्ये राजरोसपणे उजळ माथ्याने पोलिसांच्या नाकावर टिच्चून फिरत आहेत.
गृहमंत्र्यांनी मैदानात उतरावे :
भाजप नेते गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्याच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकतेच शहरातील गुंडगिरी बाबत निवेदन दिले होते. सावेडी खूनी हल्ल्यातील आरोपी हा भाजपचाच विद्यमान नगरसेवक आहे. ज्याच्यावर हल्ला झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. गृहमंत्र्यांनी स्वतः नगरच्या मैदानात उतरत गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे जाहीर आव्हान काँग्रेसने केले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनाची प्रत गृह मंत्र्यांना देखील पाठवण्यात आली आहे.
नांगरे पाटील, कृष्णप्रकाशांसारख्या दबंग अधिकाऱ्याची गरज :
यापूर्वी देखील नगर शहरात राजकीय गुन्हेगारी बोकाळली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वासराव नांगरे पाटील, कृष्णा प्रकाश यांच्यासारख्या दबंग अधिकाऱ्यांनी घाण साफ करण्याचे काम केले होते. सध्याची भयावह परिस्थिती पाहता याचा शहर विकासावर नकारात्मक परिणाम होत असल्यामुळे पुन्हा एकदा अशा दबंग एसपींची शहराला गरज असल्यासची भावना किरण काळेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.