Sunday, March 16, 2025

नगर शहरात वकीलांसह सर्वसामान्य नागरिकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत , वकील अशोक कोल्हे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्या नंतर अभिषेक कळमकर संतप्त

सरकारने नगर शहरात वकीलांसह सर्वसामान्य नागरिकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत

वकील अशोक कोल्हे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्या नंतर अभिषेक कळमकर संतप्त

नगर: नगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना नगर शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटना वाढत आहेत. बुधवारी जुन्या कोर्ट परिसरात ॲड. अशोक कोल्हे यांच्यावर जीवघेणा हल्ला होण्याची घटना घडली आहे. पक्षकारानेच सदर हल्ला केला असून जखमी कोल्हे यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष, माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी तीव्र संताप व्यक्त करीत नगर शहरातील गुंडाराज कधी संपणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. कायद्याचे रक्षक असलेले वकिलच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नगरकरांचे काय हाल असतील? पोलिस प्रशासन फक्त गुन्हा घडल्यानंतर नोंद करण्याचे काम करीत आहे. काही महिन्यांपूर्वी राहुरीत एका वकिल दाम्पत्याचा खून झाला होता. आता नगर शहरात वकीलावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर उद्या वकील मंडळींनी काम कसे करायचे? या परिस्थितीत सर्व वकीलांना राज्य सरकारने स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने मंजूर करावेत अशी मागणीही कळमकर यांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, ॲड. शिवाजी कराळे आदींनी रूग्णालयात धाव घेऊन कोल्हे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

अभिषेक कळमकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी सातत्याने नगर शहरातील दहशत, गुंडागिरीचा मुद्दा अधोरेखित केला आहे. स्व.अनिलभैया राठोड यांच्यानंतर भयमुक्त, दहशतमुक्त, गुंडगिरीमुक्त नगर शहरासाठी लंके हेच सक्षमपणे बोलत आहेत. परंतु काही अपप्रवृत्ती असे हल्ले करून शहरातील वातावरण कलुषित करत आहेत.‌त्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.‌ कायद्याचा धाक राहिलेला नसल्यानेच गुन्हेगार निर्धास्त आहेत. पोलिसही निवडणूक, बंदोबस्त अशी कारणे देत वेळ मारून नेतात. यामुळे सर्वसामान्य नगरकरांना भीतीच्या दडपणाखाली रहावं लागत आहे. यासाठी तातडीने कारवाई करून पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे असे कळमकर यांनी म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles