नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात दूध भेसळीची मोठी माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने राहुरीत दोन ठिकाणी दूध भेसळीचे घातक रसायन, व्हे-पावडरचे नमुने जप्त करून भेसळीचे दूध नष्ट केले आहे.
राहुरी येथील शिलेगाव आणि माहेगाव येथे दूध भेसळीची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय वारघुडे आणि नगरचे सहआयुक्त भूषण मोर यांनी संयुक्त पथक तयार करून या गावात छापेमारी केली. शिलेगाव येथे एका शेती क्षेत्रात छापा घातला असता तिथे दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आला. पथकाला तिथे दूध भेसळीचे घातक रसायन तसेच व्हे-पावडर आढळली. त्यातील काही नमुने तपासणीसाठी घेऊन भेसळीचे दूध नष्ट केले.
या कारवाईत विजय कातोरे हा निसटला, तर साहिल कातोरे याला पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.माहेगाव येथील बाळासाहेब हापसे यांच्याही शेती क्षेत्रावर छापा घातला. तेथेही दूध भेसळीचे रसायन व व्हे पावडर मोठ्या प्रमाणात आढळली. बाळासाहेब हापसे याने तिथून धूम ठोकली. राहुरी पोलीस ठाण्यात पथकाने जप्त केलेले भेसळीचे दूध, रसायन, व्हे पावडर आणली. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाईप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.