नगर : शहरातील दोन घटनांत कांदा बियाणे चोरीच्या घटना घडल्या. दोन्ही घटना शहरातील बाजार समिती परिसरात घडल्या. त्यातून एकूण ५८ हजार ५०० रुपये किमतीचे कांदा बियाणे चोरीस गेले. यासंदर्भात कोतवाली पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.
अरबाज निसार शेख (रा. गाझीनगर, काटवण खंडोबा रस्ता, नगर) यांनी त्यांचा टेम्पो शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी माळीवाडा भागातील वसंत टॉकीज रस्त्यावरील अरिहंत ड्रायफूट दुकानासमोर उभा केला होता. ४.४० ते ४.५० या दहा मिनिटातच चोरट्याने टेम्पोतून २८ हजार ५०० रुपये किमतीची येलोरो कंपनीच्या कांदा बियाणांची पेटी पळवली. या पेटीमध्ये ३० पाकिटे कांदा बियाणे होती. या संदर्भात शेख यांनी काल, शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसऱ्या घटनेत गणेश सुखदेव दळवी (रा. म्हसणे, पारनेर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दळवी शनिवारी नगर बाजार समितीच्या आवारात टेम्पो उभा करून ते बाविस्कर टेक्नॉलॉजी येथील कृषी सेवा केंद्रात खरेदीसाठी गेले होते. टेम्पोतून येलोरो कंपनीचे ३० हजार रुपये किमतीचे कांदा बियाणांच्या पेटीची चोरी केली.