बँकेतून ऑनलाइन पद्धतीने परस्पर १ लाख ८० हजार रुपये काढून फसवणूक
नगर : क्रेडिट कार्डमधून परस्पर १ लाख ८० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेत व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली. यासंदर्भात मिलिंद चंद्रकांत गांधी (५७, स्टेशन रस्ता, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिलिंद गांधी यांचे शहरात माळीवाडा भागात कापड दुकान आहे. त्यांच्याकडे एयू बँकेचे क्रेडीट कार्ड आहे. त्याचा वापर ते कापड दुकान व घर खर्चाकरता करतात. २४ फेब्रुवारीच्या सायंकाळी गांधी व त्यांची पत्नी कापड दुकानात असताना त्यांच्या मोबाइलवर क्रेडीट कार्डवरून व्यवहार झाल्याचा संदेश आले. त्यांनी व्यवहार केलेले नसल्याने तत्काळ टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती घेतली. त्यांना तुमच्या एयू बँकेच्या क्रेडीट कार्डवरून ५५ हजार, ५५ हजार, ६० हजार, १० हजार असे एकूण चार व्यवहार झाल्याचे व त्याव्दारे १ लाख ८० हजार रुपये काढल्याचे कळवले. क्रेडीट कार्डवरून व्यवहार केले नसल्याने त्यांनी कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले व सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी एयू बँकेशी पत्रव्यवहार करून क्रेडीट कार्डव्दारे झालेल्या व्यवहाराची माहिती घेतली. गांधी यांच्या क्रेडीट कार्डमधून डेबीट झालेली रक्कम फ्रिज करण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. दरम्यान त्यांना आजपर्यंत रक्कम न मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस अंमलदार सूर्यकांत डाके अधिक तपास करत आहेत.