नगर – बेकायदेशीर सावकारकीतून व्याजाने घेतलेल्या अडीच लाख रुपयापोटी दीड एकर क्षेत्र नावावर करुन परस्पर विक्री करुन फसवणुक करणाऱ्या सारोळा सोमवंशी (ता. श्रीगोंदा) येथील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार सुनिल ताराचंद वाघमारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर बेलवंडी पोलीस स्टेशनच्या वतीने उपोषण न करण्याचे सांगून गुन्हा दाखल करुन घेण्याचे आश्वासन देऊन देखील गुन्हा दाखल होत नसल्याने तक्रारदार वाघमारे यांनी कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षक कार्यालया समोर 11 डिसेंबर रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
ताराचंद शंकर वाघमारे यांच्या नावे सारोळा सोमवंशी (ता. श्रीगोंदा) येथील गट नंबर 20 मध्ये साडेचार एकर क्षेत्र आहे. भाऊजाई (वहिनी) कॅन्सरने आजारी असल्याने व तिच्या वैद्यकीय खर्चासाठी तातडीने पैसे लागत असल्याने कांताबाई आढाव व प्रवीण आढाव यांच्याकडून ताराचंद वाघमारे यांनी अडीच लाख रुपये 3 टक्के व्याजाने घेतले होते. त्यांना संरक्षण म्हणून दीड एकर क्षेत्र बिनताब्याचे साठेखत करून दिले. परंतु त्यांनी साठेखत करत असताना जनरल मुखत्यारपत्र करून घेतले. आजाराने भाऊजाईची परिस्थिती खालवली असल्याने सर्वच मानसिक दडपणाखाली होते. याचा फायदा घेऊन आढाव यांनी साठेखतबरोबरच जनरल मुखत्यारपत्र करून घेतले. वाघमारे यांचे पाच मुले असताना व गरज नसताना त्यांनी मुखत्यारपत्र तयार करून घेतले. वडील मानसिकरित्या खचलेले होते व त्यांनी ते सर्व कागदपत्रे वाचून पाहिले नाही. समोरच्यांनी साठेखत म्हणून मुखत्यारपत्रावर सह्या करून घेतल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे.
2019 मध्ये ज्याच्या नावे साठेखत करुन दिले होते, या कांताबाई आढाव यांनी ती जमीन साठे खतावरून स्वत:च्या नावे करुन घेतली. तर ही जमीन कांताबाई यांनी महिन्याभरापूर्वी सुवर्णा उदार यांना विकली आहे. उदार यांना वाघमारे यांनी जमीन घेऊ नका आमची फसवणूक झालेली असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांनी आमच्या कुटुंबीयांना जातिवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या जमीन प्रकरणी फसवणुक झाल्याबाबतचा तक्रार अर्ज बेलवंडी पोलीस स्टेशनला देण्यात आलेला होता. बीट अंमलदार यांनी संबंधितांना बोलावले असता सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर मुद्दल व राहिलेले 3 टक्के व्याजाने पैसे दिल्यास जमीन सोडण्यास कबूल केले. परंतु गावात गेल्यानंतर बदलून पडले आणि जातीवाचक शिवीगाळ व दमबाजी करुन 12 लाख रुपये देण्यास सांगत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अडीच लाख रुपयात दीड एकर क्षेत्र लाटणारे व जातीवाचक शिवीगाळ करुन धमकाविणाऱ्यांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुनिल वाघमारे यांनी केली आहे.
अडीच लाख रुपयापोटी दीड एकर क्षेत्र नावावर करुन परस्पर विक्री… नगरमधील शेतकऱ्याची तक्रार
- Advertisement -